पालकांनी घ्यायची नवजात बाळाची काळजी | Newborn Baby Care in Marathi

घरात जेव्हा नवीन बाळ जन्माला येते तेव्हा घरातील सर्व मंडळी आनंदित असतात पण जेव्हा नवजात बाळाची काळजी (Newborn Baby Care in marathi) घेण्याची वेळ येते तेव्हा ते चिंतीत सुद्धा होतात. अश्या वेळेस नवजात बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे ही माहिती असणे आवश्यक असते.

जन्म झाल्यानंतर बाळाच्या कोणत्या गोष्टी माहिती असणे महत्वाचे असते ?

बाळाच्या जन्मावेळी काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक असते.

१) बाळाचा जन्म झाल्यावर बाळ लगेच रडले आहे की नाही?

२) बाळाची शी ची जागा सामान्य आहे की नाही?

३) बाळ वारंवार उलटी तर करत नाही ना?

४) बाळाला श्वास घेण्यास त्रास तर नाही होत आहे?

५) बाळाला दूध पिण्यास त्रास तर नाही होत आहे ?

वरील गोष्टींपैकी काही दिसून आले तर त्वरित बाळाला बालरोगतज्ज्ञांकडे दाखवणे महत्वाचे असते.

newborn baby care in marathi

पालकांनी नवीन बाळाची कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी ?

बऱ्याचदा पालकांची पहिली वेळ असली की पालक नेहमी आपल्या बाळाच्या काळजीत असतात. परंतु घाबरून न जाता आपल्या बाळाची योग्यप्रकारे काळजी घेणे फार महत्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊया नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची

बाळाला फक्त आईचे दूध पाजणे

बाळ जन्मल्यानंतर बाळाला अर्ध्या तासाच्या आत आईचे दूध पाजणे महत्वाचे असते. नॉर्मल किंवा सिझरिन डिलिव्हरी झाली असेल तरी बाळाला लवकरात लवकर आईच्या अंगावरचे दूध पाजणे महत्वाचे असते.

आईच्या सुरवातीच्या दुधाला कोलोस्ट्रम असे म्हणतात. त्यामध्ये बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक अश्या अँटीबॉडी असतात. त्यातील व्हिटॅमिन अ बाळाच्या डोळ्यांसाठी महत्वाचे असते. बाळाला होणाऱ्या कावीळ चे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा कोलोस्ट्रम महत्वाचे असते. इतके सर्व फायदे मोफत मिळत असतील व ते बाळाच्या तब्येतीसाठी चांगली असतील तर आपण नक्की त्याचा उपयोग करून घेणे महत्वाचे असते.

आईचे दूध जरी कमी प्रमाणात येत असेल तरी बाळाला दूध पाजण्यासाठी छातीला लावणे महत्वाचे असते कारण बाळाने निप्पल चोखल्याने आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन तयार होतो व दूध येण्याचे प्रमाण हळूहळू वाढते तेव्हा आईने नेहमी सकारात्मक असणे आवश्यक असते.

जन्मानंतर लगेच अंगावरचे दूध पाजल्याने आई व बाळ यांच्यातील बंध (Newborn Baby Care in marathi) वाढतो.

बाळाच्या शरीराचे तापमान तपासून घेणे

डिलिव्हरी नंतर बाळाचा अचानक वेगळ्या वातावरणाशी संपर्क येतो त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान कमी होऊ शकते. अश्या वेळेस बाळाला कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळणे महत्वाचे असते.

हिवाळ्यात बाळाच्या शरीराच्या तापमानाची विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाच्या शरीराचे तापमान जर खूप कमी झाले तर बाळ सुस्त पडू शकते व बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

बाळाला कपडे घालण्याचा मुहूर्त पाहत बसू नका. पहिल्या दिवशीसुद्धा बाळाला कपडे घालू शकतात.

उन्हाळ्यात वातावरणच गरम असल्याने बाळाच्या शरीराचे तापमान सुद्धा जास्त असू शकते. अश्या वेळेस नवजात बाळाचा ताप थर्मोमीटर ने मोजून घेणे फार महत्वाचे असते.बाळाला १०० फ़रेनहाइट पेक्षा जास्त ताप असेल तर तापाचे औषध द्यावे.

औषध देऊन सुद्धा ताप कमी होत नसेल व बाळ सुस्त पडत असेल तर आपल्या बालरोगतज्ज्ञांशी त्वरित संपर्क करावा.

बाळाने शी करणे

सर्वप्रथम बाळाला शी ची जागा आहे कि नाही हे तपासून घेणे महत्वाचे असते. जर ती जागा नॉर्मल असेल तर बाळाने पहिल्या चोवीस तासांमध्ये शी करणे महत्वाचे असते. जर बाळाने पहिल्या चोवीस तासात शी केलेली नसेल व सोबत बाळाचे पोट फुगलेले असेल किंवा बाळ दूध नीट पीत नसेल तर त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

सुरवातीची बाळाची शी काळसर रंगाची असते त्याला मेकोनियम असे म्हणतात. बऱ्याचदा बाळाच्या आतड्यांमध्ये काही अडथळा असला तर बाळ शी करू शकत नाही व ती इमर्जनसी असते. जर बाळाने चोवीस तासाच्या आत शी केली असेल व नंतर बाळ दिवसातून ७-८ वेळेस  किंवा 3-४ दिवसातून एकदा शी करत असेल तर ते नॉर्मल असते.

बाळाने सु करणे 

बाळाने पहिल्या ४८ तासात लघवी करणे महत्वाचे असते. बाळ लघवी करत असतांना बाळाच्या लघवीची धार व्यवस्थित आहे की नाही  हे तपासून घेणे महत्वाचे असते.

बाळ जर मुलगा असेल व बाळाच्या लघवीची धार थेंब थेंब येत असेल तर बाळाच्या लघवीच्या मार्गात अडथळा असण्याची शक्यता असते. अश्या अडथळ्याला पोस्टेरीअर युरेथ्राल व्हाल्व्ह असे म्हणतात. त्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

बाळाच्या टाळूची काळजी

बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्या कवटीची हाडे जुडलेली नसतात परंतु ते एक जाड मांसल पडद्याने जोडलेली असतात या पडद्याला टाळू असे म्हणतात.

बाळाच्या कवटीवर असे ४ प्रकारचे टाळू असतात. परंतु डोक्याच्या वरील बाजूस असलेला टाळू हा सर्वात मोठा असतो. बाळाच्या मेंदूची वाढ ही दीड ते दोन वर्षांपर्यंत होत असते. ही मेंदूची वाढ होण्यासाठी कवटीची हाडे जुडलेली नसतात.

घरातील मंडळींना हा समोरचा टाळू केव्हा भरेल याची चिंता असते त्यासाठी त्या टाळूवर खूप तेल लावले जाते किंवा हळदीचा लेप लावला जातो. असे करून सुद्धा टाळू दीड वर्षाला भरणार असतो.

उलट जास्त तेल लावल्याने बाळाच्या टाळूवर बुरशी वाढायला सुरवात होते आणि त्या भागाचा मेंदूशी संपर्क असल्याने बाळाला मेंदू संसर्ग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे बाळाच्या टाळूवर तेल टाकणे किंवा हळद लावणे टाळावे.

बाळाच्या बेंबीची काळजी

जन्मावेळी बाळाची नाळ २ -३ सेमी सोडून कापलेली असते ती नाळ सातव्या किंवा आठव्या दिवशी कोरडी होऊन पडून जाते. नाळ पडल्यानंतर बेंबीवर तेल लावणे टाळावे. ती जागा १-२ दिवसात कोरडी होते. त्या जागेवर पावडर सुद्धा लावू नये.

जर बेंबीतून काही घाण येत असेल किंवा रक्त येत असेल तर बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा बाळाची बेंबी ही खूप वर आलेली असते तेव्हा बाळाला अँब्लिकल हर्निया असू शकतो. पोटावरील स्नायूंमधील अंतर राहिल्यामुळे हा हर्निया तयार होतो परंतु वयाच्या दोन ते तीन वर्षेपर्यंत हा हर्निया कमी होतो.

जर तीन वर्षेनंतर सुद्धा बेंबीचा हर्निया तसाच असेल तर त्याला शस्त्रक्रियेची गरज पडू शकते.

बाळाची मालिश करणे

बाळाची मालिश केल्याने बाळ शांत होते. बाळाच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढते. पचन व्यवस्थित होते, बाळाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. आई व बाळ यांमधील बंध अजून घट्ट होतो.

मालिश करतांना गाणे गुणगुणल्याने बाळाला आरामदायी वाटते. गॅसेस चा त्रास सुद्धा कमी होतो. मालिश ही साध्या खोबरेल तेलाने केली तरी फायदेशीर राहते. मालिशसाठी मोहरीचे तेल किंवा रिफाइन नसलेले शेंगदाणा तेल वापरू नये. मालिश करत असतांना बाळाच्या कानात, नाकात, इंद्रियात तेल टाकू नये.

वरील प्रकारे नवजात बाळाची काळजी (Newborn Baby Care in marathi) घेतली व धोक्याची चिन्हे ओळखली तर आपल्या बाळाला असलेला धोका तुम्ही टाळू शकता. वरील लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेयर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल.

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

2 thoughts on “पालकांनी घ्यायची नवजात बाळाची काळजी | Newborn Baby Care in Marathi”

Leave a Comment