नवजात बाळांमध्ये सरफॅक्टंट थेरपी | Surfactant Therapy in Marathi

Surfactant Therapy in Marathi : नवजात बाळ कमी दिवसाचे जन्माला आले की त्याला सरफॅक्टंट थेरपीची गरज पडत असते. या मागचे कारण म्हणजे अश्या बाळांमध्ये फुफ्फुसात परिपक्वता आलेली नसते व फुफ्फुसात सरफॅक्टंट हा पदार्थ अश्या बाळांमध्ये कमी प्रमाणात असतो. सरफॅक्टंट चे काम म्हणजे फुफ्फुसातील मार्गाला फुगवून ठेवण्याचे असते जेणेकरून बाळाला श्वास घेता येईल. कमी दिवसात जन्माला आलेल्या बाळांमध्ये सरफॅक्टंटचे प्रमाण फार कमी असते म्हणून त्यांना सरफॅक्टंट थेरपी ची गरज पडत असते.

चला तर मग जाणून घेऊया सरफॅक्टंट थेरपी विषयी आवश्यक असलेली माहिती

Surfactant Therapy in Marathi

सरफॅक्टंट हे फॉस्फोलिपिड व प्रोटीन पासून बनलेला एक प्रकारचा फुफ्फुसातील पदार्थ असतो. सरफॅक्टंट हा फुफ्फुसातील श्वसननलिकेच्या मार्गातील नळ्यांच्या पुष्ठभागावर पसरलेला असतो ज्यामुळे तो त्या नळ्यांमधील ताण कमी करत असतो व तो मार्ग फुगलेला राहतो. ज्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होत नाही.

सरफॅक्टंट ची कमतरता कोणत्या आजारात दिसून येते?

सरफॅक्टंट ची कमतरता रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम या आजारात कमी दिवसांच्या बाळांमध्ये दिसून येते. काही पूर्ण दिवसाच्या बाळांमध्ये मेकोनियम ऍस्पिरेशन सिंड्रोम, पल्मनरी हेमोरेज (फुफ्फुसात रक्तस्राव होणे) तसेच निमोनिया व जंतुसंसर्ग झालेला असेल तर सरफॅक्टंट ची कमतरता दिसून येते. अश्या नवजात बाळांची काळजी खूप काळजीपूर्वक घ्यावी लागत असते.

सरफॅक्टंट थेरपी जन्मानंतर लगेच देणे का महत्वाचे असते?

बाळ जन्मलेलं आल्यांनतर बाळाच्या फुफ्फुसात काही प्रमाणात द्रव्य असते. जर सरफॅक्टंट थेरपी लवकरात लवकर देण्यात आली तर सरफॅक्टंट हा त्या द्रव्यासोबत जवळपास संपूर्ण फुफ्फुसात पसरतो त्यामुळे श्वसन मार्गाच्या पुष्ठभागावरील तणाव कमी होतो.

बाळाला सरफॅक्टंट देण्यास उशीर झाला तर त्याच्या फुफ्फुसाला इजा होऊ शकते व अश्या वेळेस फुफ्फुसात इन्फ्लमेटोरी पदार्थ तयार होत असतात. तसेच तेथील नसांमधून रक्तस्राव होण्यास सुरवात होते. त्यामुळे जन्मानंतर लगेच बाळाला सरफॅक्टंट थेरपी मिळाल्याने बाळाचा जीव वाचण्याची शक्यता वाढत असते.

आणखी वाचा : नवजात बाळाला होणाऱ्या ७ प्रकारच्या इजा

सरफॅक्टंट थेरपी कोणत्या कारणांसाठी देण्यात येत असते?

नवजात बाळाला खालील समस्या असतील त्यावेळेस सरफॅक्टंट थेरपी देण्यात येते

  • तपासणीवरून व रेडिओग्राफिक पुरावा नुसार रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असेल तर
  • नवजात बाळ कमी दिवसाचे म्हणजे ३२ आठवड्यांपेक्षा कमी दिवसांचे असेल तर
  • नवजात बाळ कमी वजनाचे म्हणजे १.३ किलो पेक्षा कमी वजनाचे असेल तर
  • नवजात बाळ इंटुबेटेड असेल व फिओ २ ४० टक्के पेक्षा जास्त प्रमाणात लागत असेल तर
  • तीव्र मेकोनियम ऍस्पिरेशन सिंड्रोम असेल तर
  • फुफ्फुसात रक्तस्राव झालेला असेल तर

सरफॅक्टंट थेरपी कशी देण्यात येते ?

  • सरफॅक्टंट थेरपी ही श्वासनलिकेत नळी टाकून (एन्डोट्रॅकियल इंटुबेशन) देण्यात येत असते.
  • सरफॅक्टंट थेरपी देण्यासाठी डॉक्टर व अनुभवी नर्स ची आवश्यकता असते
  • सरफॅक्टंट थेरपी देत असतांना बाळाला मॉनिटर लावलेले असते. ज्यामुळे हृदयाची गती, श्वसनाची गती तसेच ऑक्सिजनची मात्र समजून येत असते.
  • श्वसननलिकेत नळी टाकल्यांनंतर छातीच्या दोन्ही बाजूला श्वास नीट घेतला जात आहे याची खात्री करण्यात येते.तसेच त्या नळीची स्थिती जाणून घेण्यासाठी एक्स रे सुद्धा काढण्यात येऊ शकतो.
  • काही बाळ कन्टीनुएस पॉसिटीव्ह एयरवे प्रेशर वर असतात त्यांच्यामध्ये श्वसननलिकेत नळी टाकण्यात येते म्हणजे इंटुबेशन करण्यात येते नंतर सरफॅक्टंट देण्यात येते व नंतर ती नळी काढून टाकण्यात येते. या प्रक्रियेला इन्शुयर (INSURE) असे म्हणतात.
  • सरफॅक्टंट देणाऱ्या डॉक्टर व नर्सने हाताची स्वछता केल्यानंतर हातात ग्लोव्ह घालूनच ही प्रोसिजर करण्यात येत असते.
  • सरफॅक्टंट चे औषध काही प्रमाणात खोलीच्या तापमानाबरोबर गरम होऊ द्यावे लागत असते.
  • सरफॅक्टंट देण्यासाठी फिडींग ट्यूबचा वापर करण्यात येत असतो. ही ट्यूब एन्डोट्रॅकियल ट्यूब च्या शेवटच्या टोकापर्यंत सोडण्यात येत असतो व त्याला जोडण्यात आलेल्या सिरिंज मध्ये औषध घेऊन सरफॅक्टंट श्वसननलिकेत सोडण्यात येत असते.
  • सरफॅक्टंट थेरपी देत असतांना बाळाला पूर्णपणे आडवे झोपवण्यात येत असते.
  • सरफॅक्टंट थेरपी एक मिनिटाच्या आत देण्यात येत असते.
  • काहीं वेळेस सरफॅक्टंट देत असतांना एन्डोट्रॅकियल ट्यूब ही ब्लॉक होत असते. अश्या वेळेस सरफॅक्टंट देणे थांबवून त्या नळीचा मार्ग मोकळा करावा लागत असतो.
  • गरजेनुसार बाळाला CPAP किंवा व्हेंटिलेटर लावण्यात येत असते.
  • सरफॅक्टंट थेरपी दिल्यानंतर बळावर काही वेळ डॉक्टरांची निगराणी असते.
  • एन्डोट्रॅकियल ट्यूब सक्शन सरफॅक्टंट थेरपी दिल्यानंतर २ तासांसाठी टाळावी लागत असते.

सरफॅक्टंट थेरपी देत असतांना काय समस्या येतात?

सरफॅक्टंट देत असतांना हृदयाची गती कमी होणे, बाळाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे तसेच एन्डोट्रॅकियल ट्यूब ब्लॉक होणे अश्या समस्या येत असतात अश्या वेळेस सरफॅक्टंट देणे थांबवून बाळाचे व्हायटलकरण्यात येत असतात व नंतर पुन्हा उरलेली प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. निमोथोरॅक्स, पल्मनरी हेमोरेज सारख्या समस्या सुद्धा बाळामध्ये दिसून येऊ शकतात.

सरफॅक्टंट थेरपी देण्याचे काय फायदे असतात?

प्रत्येक बाळामध्ये सरफॅक्टंट थेरपी देण्याचे फायदे हे कमी जास्त प्रमाणात दिसून येत असतात.

सरफॅक्टंट थेरपीला प्रतिसाद येणे हे खालील घटकांवर अवलंबून असते.

  • कोणत्या वेळेत थेरपी देण्यात आली
  • बाळाला असलेला आजार
  • बाळाच्या फुफ्फुसाची परिपक्वता

वेळेत करण्यात आलेला उपचार हा खूप फायदेशीर असतो. त्यामुळे खालील प्रकारचे फायदे दिसून येतात.

  • बाळाला श्वास घेण्यासाठी होणार त्रास कमी होतो
  • छातीत हवा जमा होण्याचे प्रमाण कमी होते (निमोथोरॅक्स)
  • दुसऱ्यांदा सरफॅक्टंट थेरपी  दिल्याने बाळाचा जीव वाचण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते.

सरफॅक्टंट थेरपी देण्यासाठी कोणते सरफॅक्टंट वापरण्यात येत असतात?

सरफॅक्टंट थेरपी देण्यासाठी सुरवंता, इन्फासर्फ, क्युरोसर्फ़ हे सरफॅक्टंट वापरण्यात येत असतात. बाळाला असणाऱ्या आवश्यकतेनुसार सरफॅक्टंट बाळाला देण्यात येत असते.

  • सुरवंता सरफॅक्टंट सहा ते बारा तासाच्या अंतराने चार वेळेस देता येऊ शकते.
  • इन्फासर्फ़ सरफॅक्टंट बारा तासाच्या अंतराने तीन वेळेस देता येऊ शकते.
  • क्युरोसर्फ़ सरफॅक्टंट बारा तासाच्या अंतराने दोन वेळेस देता येऊ शकते.

निष्कर्ष

वेळेवर केलेला उपचार हा कधीही फायद्याचा असतो. सरफॅक्टंट थेरपी सुद्धा आवश्यक असणाऱ्या बाळाला लवकरात लवकर मिळाली की बाळाची तब्येत लवकर बरी होत असते. तसेच बाळाचा जीव सुद्धा वाचवता येतो त्यामुळे अश्या वेळी पालकांनी लवकरात लवकर निर्णय करून सरफॅक्टंट थेरपी देण्याचा निर्णय डॉक्टरांना कळवावा.

पालकांना आपल्या नवजात बाळाला एन आई सी यु मध्ये उपचार घ्यावा लागणे हा फार नाजूक क्षण असतो. परंतु अत्यावश्यक असलेला उपचार वेळेत घेतला तर बाळाचे भविष्य चांगले राहते त्यामुळे अश्या वेळेस पालकांनी खंबीर राहून योग्य तो निर्णय घेतलेला कधीही फायदेशीर असतो. 

Ref – Safecare

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment