Effective care of Dengue Fever in children in Marathi | मुलांमध्ये डेंग्यू झाल्यावर घेण्याची काळजी

डेंग्यू (Dengue Fever in children in Marathi) हा विषाणूजन्य आजार असून तो एडिस या डासांमुळे पसरत असतो. डेंग्यू या आजाराचा रुग्ण सर्वप्रथम इ.स १६३५ मध्ये वेस्ट इंडिज या देशात आढळून आला होता. भारतातील सर्व प्रथम रूग्ण तामिळनाडू राज्यातील वेल्लोर  या गावात १९५६ साली आढळून आला. लहान मुलांमध्ये डेंग्यू आजार होणे खूप सामान्य झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया डेंग्यू बद्दल संपूर्ण माहिती

Table of Contents

लहान मुलांमध्ये डेंग्यू आजार कशामुळे होतो ? (Dengue causes in Marathi)

डेंग्यू आजार हा डेंग्यू विषाणूमुळे होतो. जो फ्लॅव्हि वायरस फॅमिली मधील विषाणू असतो. डेंग्यू विषाणू हा सिंगल स्टैंडर्ड  RNA  व्हायरस असून तीन स्ट्रक्चरल प्रोटीन व ग्लायको प्रोटीन, सात नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन ने बनलेला असतो. डेंग्यू व्हायरस चे चार प्रकार असतात. माणूस हा या व्हायरसचा रिझर्व्हायर असतो.

डेंग्यू आजार हा एडिस इजिप्ती (डेंग्यू चा डास) या डास मुळे पसरतो परंतु काही वेळेस एडिस अल्बोप्रिक्टस नावाचा डास सुद्धा डेंग्यू पसरवतो . एडिस जमातीचे डास पावसाच्या स्वच्छ पाण्यावर, नारळाच्या करवंट्यामध्ये जगतात.

डेंग्यू डासाच्या अंगावर पांढऱ्या प्रकारचे पट्टे असतात म्हणून त्यांना टायगर डास (Dengue mosquito in marathi – Tigar Mosquito) असे सुद्धा म्हणतात. डेंग्यू चा डास हा जास्त करून दिवसा म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर तसेच सूर्यास्त होण्याच्या आधी चावत असतो.

डेंग्यू डासाने चावलेली जागा ही जास्त प्रमाणात लाल असते तसेच त्या ठिकाणी खाज सुद्धा येत असते.

जेव्हा एडिस डास एखाद्या डेंग्यू झालेल्या रुग्णाला चावतो तेव्हा तो डास त्या रुग्णाच्या रक्तामध्ये असलेल्या डेंग्यू विषाणूला सुद्धा आपल्या शरीरात ओढतो. अशावेळी त्या व्हायरसचा दहा दिवस इंक्युबेशन पिरिअड असतो जर तो डास कोणी निरोगी माणसाला दहा दिवसानंतर चावला तर त्याला डेंग्यू होतो. पावसाळ्याच्या चार ते सहा आठवड्यात डेंग्यू हा आजार दिसून येतो.

लहान मुलांमध्ये डेंग्यूची कोणती लक्षणे असतात ? (Dengue chi lakshane)

डेंग्यू संसर्ग होण्याचा सात ते आठ दिवसात लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे (Dengue chi lakshane) दिसून येतात.

  • अत्यंत तीव्र ताप येणे. डेंग्यू च्या तापाला हाडी ताप असे म्हणतात याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णाच्या शरीरातील हाडे दुखून येत असतात. डेंग्यूचा ताप हा खूप जास्त प्रमाणात असू शकतो १०२-१०३ डिग्री फ़्रेंहैट. या तापामध्ये थंडी सुद्धा वाजून येत असते.
  • प्रचंड प्रमाणात डोकेदुखी, अंगदुखी होणे. डोळ्यांमागे दुखून येणे
  • भूक न लागणे. रुग्णाची भूक ही भरपूर प्रमाणात कमी झालेली असते व काहीच खाण्याची इच्या नसते.
  • सांधे दुखून येणे.
  • ताप आल्याच्या दोन ते तीन दिवसात अंगावर लालसर पुरळ येणे.
  • उलट्या व मळमळ होणे.
  • पोटात दुखून येणे. 
  • बऱ्याच रुग्णांमध्ये डेंग्यू ची सुरवात ही सर्दी, ताप, खोकल्यापासून होत असते. जर वरील लक्षणांबरोबर अशक्तपणा असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

डेंग्यू हेमोरेजिक फीव्हर-  यामध्ये वरील लक्षणांसोबत नाकातून, हिरड्यातून रक्त येणे, झटके येणे ही लक्षणे दिसून येतात.
डेंग्यू शॉक सिन्ड्रोम-- यामध्ये डेंग्यू हेमोरेजिक फीव्हर सारखे व रक्तदाब कमी होणे असे लक्षणे दिसून येतात. या प्रकारात रुग्णाच्या जीवाला खूपच धोका असतो.

लहान मुलाला अत्यंत तीव्र ताप येत असेल व त्याचे कारण काही समजून येत नसेल व थंडी वाजून येत असेल अशा वेळी डेंग्यूची टेस्ट केली जाते.

लहान मुलांची भूक खूप कमी होऊन जाते व त्याच्या तोंडाला चव सुद्धा राहत नाही.  त्यामुळे ते काहीच खात नाही. सतत कमी  होणाऱ्या प्लेटलेट्समुळे मुलाला चक्कर सुद्धा येतात.

अशक्तपणा – डेंग्यूमुळे मुलाचा रक्तदाब हा कमी होतो त्यामुळे त्यांना खूप अशक्तपणा येतो. काही वेळेस मुलांना चालण्याची सुद्धा शक्ती राहत नाही.

अंगावर पुरळ येणे– अंगावर सर्वत्र पुरळ येत असते व त्यासोबत खाज सुद्धा वाढत असते अशा वेळी बाळाला डेंग्यू ( Dengue Fever in Marathi) असू शकतो.

सर्दी, खोकला काही वेळेस बाळाला सर्दी ,खोकला झालेला असतो व नंतर वरील लक्षणे दिसून येतात.

डेंग्यू चे प्रकार कोणते असतात ?

वरील लक्षणांवरून डेंग्यूचा आजार हा तीन प्रकारचा असतो.

 1) डेंग्यू फीवर (Dengue Fever)

 2) डेंग्यू हेमोरेजिक फीवर (Dengue Haemorrhagic Fever)

 3) डेंग्यू शॉक सिन्ड्रोम (Dengue Shock Syndrome)

लहान मुलांमध्ये डेंग्यू तापाचे निदान कसे केले जाते ?

डेंग्यू तापाचे निदान डॉक्टर तपासणी व लक्षणांवरून करतात. डेंग्यू तापाची पुष्टी करण्यासाठी रक्ताच्या तपासण्या व डेंग्यू एंटीजन टेस्ट केली जाते.

  • रक्ताची तपासणी – रक्ताच्या तपासणीमध्ये पांढऱ्या पेशी कमी झालेल्या असतात. प्लेटलेट्स सुद्धा कमी झालेल्या असतात हेमॅटोक्रिट हे वाढलेले असते. कारण रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते .
  • डेंग्यू एंटीजन टेस्ट एनएस1 ,आय जी एम, आय जी जी प्रकारची असते.

एन एस 1 पॉझिटिव म्हणजे नुकताच झालेला संसर्ग. एन एस १ हा डेंगू व्हायरस चा एक प्रकारचा प्रोटीन असतो जो डेंगू आजाराच्या सुरवातीला रक्तामध्ये आढळून येत असतो.

आय जी एम पॉझिटिव म्हणजे 3/4 दिवस आधी झालेला संसर्ग.

आय जी जी पॉझिटिव म्हणजे सात ते आठ दिवस आधी झालेला संसर्ग.

  • एक्स रे – एक्स रे वर छातीत तयार झालेल्या निमोनियाबद्दल माहिती मिळते.
  • सोनोग्राफी – सोनोग्राफी मध्ये रुग्णाच्या पोटात, छातीत पाणी जमा झाल्याचे दिसून येते. यकृत व पित्ताशयावर सूज आलेली असते.

डेंगू या आजारात रक्तवाहिन्यांमधून पाणी शरीरातील पोकळीत जमा होण्यास सुरवात होत असते. त्यामुळे ज्या रुग्णाचा आजार जास्त प्रमाणात वाढलेला असेल अश्या रुग्णामध्ये छातीत तसेच पोटात पाणी जमा होण्यास सुरवात होते.

रुग्णाचा रक्तदाब सुद्धा मोजण्यात येतो त्यात तो त्या वयानुसार कमी असतो.

लहान मुलांमध्ये डेंग्यू मध्ये धोक्याची चिन्हे कोणती असतात ?

  •  रक्ताच्या उलट्या होणे.
  •  श्वास घेण्यास त्रास होणे.
  •  पोटात खूपच दुखून येणे
  •  खूपच अशक्तपणा येणे.

अशी काही लक्षणे दिसून आली तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा वेळी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ असते

लहान मुलांमध्ये डेंग्यू चा उपचार काय असतो ?

डेंग्यू (dengue fever in marathi) हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर औषध उपलब्ध नाही पण खालील गोष्टी करणे महत्त्वाचे असते

  •  भरपूर प्रमाणात पाणी पिणे
  •  ताप जर आला तर पेरासिटामोल सिरप वापरावे. आयबुप्रोफेन किंवा अस्पिरीन वापरू नये.
  •  सर्व प्रकारची फळे खावी.
  •  तेलकट पदार्थ खाऊ नये.
  •  अंगावर पुरळ आली असेल तर कॅलामाइन लोशन ज्या ठिकाणी पुरळ आली आहे तेथे वापरू शकतात.

वरील सर्व उपाय करून लक्षणे कमी होत नसतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अशावेळी डॉक्टर रुग्णाला भरती होण्याचा सल्ला देऊ शकतात .

भरती झाल्यावर सलाईन लावण्यात येते. डेंग्यू मध्ये शरीरातील पाणी कमी होत असल्या कारणाने देशाला जास्त प्रमाणात सलाईनची गरज पडू शकते. दुसरा कोणता संसर्ग होऊ नये म्हणून अँटिबायोटिक काही वेळेस दिली जातात.

रुग्ण भरती असतांना त्याचा रक्तदाब मॉनिटर करावा लागत असतो. रुग्णाच्या कान नाकातून रक्तश्राव तसेच त्याच्या मलाचा काळा रंग असला तर त्याला रक्त लावायची (प्लेटलेट्स) गरज पडू शकते. अश्या वेळेस रुग्णाला आय सी यु मध्ये भरती करण्याची गरज पडत असते.

डेंगू मध्ये प्लेटलेट केव्हा लावाव्या लागतात ?

डेंगू रुग्णाला प्लेटलेट या खालील कारणांसाठी लावण्यात येऊ शकतात.

  • रुग्णाचे प्लेटलेट काउन्ट २०००० पेक्षा कमी असेल तर
  • रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर असेल तर
  • शरीरातून रक्तस्त्राव होण्यास सुरवात झालेली असेल तर
प्लेटलेट चे प्रकार
  • रँडम डोनर प्लेटलेट – रँडम डोनर प्लेटलेट हे रक्तदान केलेल्या रक्तापासून केंद्रीकरण करून तयार करण्यात येते. ते तयार होण्यास ४-६ तास लागत असतात.
  • सिंगल डोनर प्लेटलेट – सिंगल डोनर प्लेटलेट हे प्लेटलेट अफेरेसिस मशीन ने तयार करण्यात येतात. एक युनिट सिंगल डोनर प्लेटलेट म्हणजे ५-८ युनिट रँडम डोनर प्लेटलेट इतके असते.

प्लेटलेट चे लाईफ २४ तास असते त्यामुळे त्या लगेच रुग्णाला लावाव्या लागत असतात.
सिंगल डोनर प्लेटलेट हे खूप महाग असते त्यामुळे ते अतिगंभीर रुग्णामध्ये वापरण्यात येते.

जेव्हा रुग्णाची भूक वाढण्यास सुरुवात होते व रक्तातील प्लेटलेट्स सामान्य रेंजमध्ये येतात तेव्हा पेशंटला हॉस्पिटलमधून सुट्टी करण्यात येते.

लहान मुलांमध्ये डेंग्यू पासून बचाव कसा करावा ? (Dengue gharguti upay )

डेंग्यूवर लस उपलब्ध नसल्याने आपल्याला डेंग्यू होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे असते त्यासाठी खालील उपाय करणे आवश्‍यक असते.

  •  मच्छर रिपेलंटचा वापर करणे.
  • आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे.
  •  मच्छरदाणीचा वापर करणे.
  •  खिडक्यांना जाळ्या लावणे.
  •  घराभोवती पावसाचे पाणी साचू देऊ नये.
  •  जुना टायर, फुलदाणी यातील पाणी फेकणे.
डेंगू साठी घरगुती उपाय (Dengue gharguti upay)
  • पपई च्या पानांचा रस हा रक्तातील प्लेटलेट वाढवण्यास फायदेशीर असतात.
  • तुळशी च्या पानांचा काढा करून पाजल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते व व्हायरल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
  • गुळवेल वनस्पतीचा काढा पिल्यानेसुद्धा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • नारळ पाणी पिल्याने शरीराला आवश्यक असणारे शार हे योग्य प्रमाणात मिळतात त्यामुळे काही प्रमाणात नारळ पाणी देऊ शकतात परंतु जास्त प्रमाणात नारळ पाणी देणे टाळावे.
  • किवी, ड्रॅगन फ्रुट चा वापर शरीरातील प्लेटलेट वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. इतर सर्व फळे खाण्यास देण्यात येऊ शकतात.
  • ताज्या हिरव्या भाजीचे सूप (मेथी, पालक) बनवून पिणे तसेच सलाड म्हणजे काकडी, टमाटर, गाजर, पत्ता गोबी असा आहार हा जास्त प्रमाणात घ्यावा.
  • तेलकट पदार्थ तसेच मांसाहार करणे शक्यतो टाळा.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

डेंग्यू हा आजार किती वेळा होऊ शकतो ?

डेंग्यू आजार डेंग्यूच्या चार विषाणूंमुळे होऊ शकतो, त्यामुळे आयुष्यात डेंग्यू चारवेळेस होऊ शकतो.

डेंग्यू मधून बरे होण्यास किती दिवस लागतात ?

डेंग्यूची लक्षणे पाच ते सात दिवस दिसून येतात त्यामुळे डेंग्यू मधून बरे होण्यास आठवडा लागू शकतो.

डेंग्यू होण्यापासून कोणी सावधान रहावे ?

ज्याला आधी डेंग्यू होऊन गेला, जो वयाने लहान किंवा अधिक वयस्कर असेल  किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती खूप कमी असेल, तर डेंग्यू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशांनी डेंग्यू होण्यापासून सावधान रहावे.

डेंग्यूमुळे कोणते अवयव प्रभावित होतात ?

डेंग्यू मध्ये जास्त करून यकृत प्रभावित होते पण हृदय व फुफ्फुस सुद्धा प्रभावित  होत असतात.

डेंग्यू मध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करणे आवश्यक असते का ?

जर पेशंट चा रक्तदाब, प्लेटलेट्स कमी होत असतील तर पेशंटला ॲडमिट करावे लागते.

डेंग्यूचा ताप पॅरासिटामोल सिरपने कमी होतो का ?

काही वेळेस होतो पण जास्त ताप असेल तर औषध देऊन स्पंजिंग करावे लागते.

डेंग्यूची चिन्हे कशी  दिसतात ?

डेंग्यू मध्ये गोवर आजार यासारखे लाल चट्टे दिसून येतात त्यासोबत अंगावर खाज  सुद्धा येते

एक वर्षाखालील बाळाला डेंग्यू होतो का ?

हो, त्यांच्यामध्ये गंभीर म्हणजे डेंग्यू हेमोरेजिक फीवर होऊ शकतो.

डेंग्यू मधून रिकव्हर होण्याचे चिन्ह काय असतात ?

ताप कमी होणे व भूक वाढणे हे रिकवरीचे चिन्हे असतात.

डेंग्यू मध्ये कोणते फळ खाणे चांगले असते ?

पपई, पपईच्या पानांचा रस हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फायदेशीर असतो.

डेंग्यू झालेली आई बाळाला दूध पाजू शकते का ?

आईच्या दुधातून डेंग्यूचा प्रसार होणे खूपच क्वचित असते पण आईच्या दुधाचे फायदे जास्त असल्याने आईचे दुध पाजले पाहिजे.

डेंग्यू चा पेशंट काही उपचार न घेता बरा होऊ शकतो का ?

जर पेशंट ने घरीच व्यवस्थित काळजी घेतली, खूप पाणी पिले.,आराम केला तर बरा होऊ शकतो पण धोक्याची चिन्हे दिसून आली तर लगेच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा

डेंग्यू मध्ये आंघोळ केली पाहिजे का ?

आंघोळ केल्याने शरीराची स्वच्छता राहते व शरीराचे तापमान सुद्धा नियमित होते. म्हणून डेंग्यू मध्ये आंघोळ करावी.

प्लेटलेट्सची किती संख्या धोकादायक असते ?

सामान्यता प्लेटलेट्सची संख्या 1 लाख 50 हजार ते चार लाख 50 हजार असते परंतु ती संख्या जर एक लाखाच्या खाली जात असेल तर धोक्याचे चिन्ह असते अशा परिस्थितीला थोम्बोसायटोपेनिया म्हणतात. 

वरील संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्की समजून आले असेल की लहान मुलांमध्ये डेंग्यू (Dengue fever in marathi) झालेला असेल तर काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून हा आजार गंभीर स्वरूपाचा होणार नाही व वेळेत उपचार घेतला तर हॉस्पिटल मध्ये लागणारा खर्च सुद्धा वाचू शकतो.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेयर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ होईल

हे देखील वाचा

लहान मुलांमध्ये बद्धकोष्टता

लहान मुलांमध्ये ताप असेल तर घेण्याची काळजी

लहान मुलांमध्ये अँपेंडिक्सचा त्रास

Ref – Pediatriconcall

5/5 - (1 vote)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “Effective care of Dengue Fever in children in Marathi | मुलांमध्ये डेंग्यू झाल्यावर घेण्याची काळजी”

Leave a Comment