लहान बाळांमधील 17 सामान्य आरोग्याच्या समस्या | 17 Newborn Baby problems in Marathi

Newborn Baby problems in Marathi : घरात लहान बाळ जन्माला आले की, घरातील सर्व मंडळींचे बाळावर बारीक लक्ष असते व बाळाला नवीन लक्षण दिसून आले की तेच सर्वजण परेशान होतात. अशावेळी खरे पाहिले तर काही घाबरण्याचे कारण नसते.

तर मग आपण जाणून घेऊ या नवजात बाळाच्या काही समस्या व त्यांना तुम्ही न घाबरून जाता त्याचे निदान व उपचार करू शकतात आणि कोणत्या समस्या धोकादायक असतात ज्या वेळेस लगेच डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे.

newborn baby problems in marathi
Newborn Baby problems in Marathi

बाळ जोरजोरात रडणे

बाळाला बोलता येत नसल्याने बाळाची भाषा ही फक्त रडण्याची असते. बाळ रडणे म्हणजे बाळाला काहीतरी त्रास होत आहे असे समजावे. बाळाचे रडणे हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी असू शकते म्हणून आपण ते जाणून घेणे महत्त्वाचे असते.

सर्वात सामान्यपणे बाळाला भूक लागली असेल तर बाळ रडण्यास सुरुवात करते.

बाळ हे काही टॉयलेटला जाऊ शकत नसल्याने त्या चड्डीतच लघवी व शी करते अशा वेळी त्या ओलसरपणामुळे बाळाला त्रास होण्यास सुरुवात होते व बाळ रडण्यास सुरुवात करते.

बाळाला पोटात दुखून आले असेल तर बाळ जोरजोरात रडण्यास सुरुवात करते आणि शक्यतोवर हे रडणे संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येते व ते पोटामध्ये गॅस तयार झाल्यामुळे असू शकते. अशा वेळी बाळाचा ढेकर काढून बाळाला पोटावर झोपल्याने बाळाच्या पोटातील गॅस बाहेर पडतो व बाळ रडणे थांबवते.

बाळ हे बराच वेळ एका ठिकाणी झोपलेले असल्याने किंवा खेळत असल्याने कंटाळा येऊन धरण्यास सुरुवात करते अशा वेळी बाळाला जरा हवा बदल हवा असतो.

बाळ रडत असेल व नंतर दूध पीत नसेल व सुस्त पण पडलेले असेल अशावेळी आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

नक्की वाचा नवजात बाळाच्या रडण्यावर १० टिप्स

नवजात बाळाला कावीळ (Newborn with Jaundice)

नवजात बाळ हे पिवळे पडण्यास सुरुवात झाली की, त्याला कावीळ झाले आहे हे बर्‍याच लोकांना माहीत असेल. परंतु नवजात बाळाला होणारा कावीळ व मोठ्या माणसांना होणारा कावीळ यात खूप मोठा फरक आहे.

नवजात बाळाचा कावीळ हा बाळाचे यकृत अपरिपक्व असल्याने होतो. त्यामुळे हे कावीळ वयाच्या तिसऱ्या दिवसापासून वाढण्यास सुरुवात होते. पाचव्या-सहाव्या दिवसापर्यंत वाढते व आठव्या ते दहाव्या दिवसापर्यंत कमी होते.

अशावेळी घाबरून न जाता आईने बाळाला दर दोन तासांनी दूध पाजणे खूपच महत्त्वाचे असते. कारण बाळाचे कावीळ त्याच्या मूत्राद्वारे बाहेर पडत असते.

सकाळचा सूर्यप्रकाश दहा ते पंधरा मिनिटे बाळाला दाखविल्याने बाळाचे कावीळ कमी होण्यास मदत होते.

जर बाळाला पिवळसरपणा जन्माच्या 24 तासाच्या आत आला किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त राहिला तर आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

नाकातून घरघर आवाज येणे

बराच वेळ आई-वडील हे बाळाच्या नाकातून आवाज येत असल्याने परेशान होतात अशा वेळी घाबरून न जाता बाळाच्या नाकामध्ये सलाईनचे थेंब टाकणे आवश्यक असते. असे केल्याने बाळाच्या नाकातील अडकलेली घाण मोकळी होते व त्याचा आवाज येणे सुद्धा थांबते.

बाळाच्या नाकातील श्वसनाचा मार्ग लहान असतो. त्यामुळे सुद्धा असा आवाज येऊ शकतो परंतु हे होणे सामान्य असते. जर बाळाला त्यासोबत ताप सुद्धा येत असेल तर बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

बाळाच्या पोटात मुरडा येणे

बाळाच्या पोटात मुरडा मारून येणे ही खूपच सामान्य समस्या असते. अशा वेळी बाळ अचानक रडण्यास सुरुवात करते व आई- वडिलांनाही रडणे काही केल्या थांबवता येत नाही. पोटात हवा किंवा गॅस अडकल्याने हा मुरडा आलेला असतो. बर्‍याचदा हे संध्याकाळी होत असते म्हणून याला  इव्हनिंग कोलिक असे म्हणतात.

काही वेळेस आईच्या दुधात किंवा फॉर्मूला दुधात असलेल्या काही घटकांमुळे पोटात मुरडा मारून येत असतो. त्यामुळे अशावेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळाचे पोट फुगलेले वाटणे

बाळाचे पोट बर्‍याचदा दूध पाजल्यानंतर फुगून आलेले दिसते याचे मुख्य कारण म्हणजे बाळाच्या पोटात गॅस किंवा हवा जमा झालेली असते हे टाळण्यासाठी बाळाला दूध पाजताना बाळाच्या तोंडात आईचे निप्पल पूर्णपणे गेलेले असले पाहिजे. जेणेकरून आजूबाजूने दुधासोबत पोटात हवा जाणार नाही.

बॉटलने दूध पिणाऱ्या बाळांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात दिसून येतो.अशा वेळी दूध पाजल्यानंतर बाळाला कढेवर घेऊन ढेकर काढून घेणे महत्त्वाचे असते.

दिवसातून दोन ते तीन वेळेस बाळाला पोटावर पालथे मारल्याने सुद्धा पोटातील गॅस निघून जातो.

बाळाचे पोट फुगलेले असेल व बाळ शी करत नसेल, दूध पीत नसेल, वारंवार उलट्या करत असेल अशा वेळी लगेच आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

बाळाने उलटी करणे

 दूध पिल्यानंतर बाळाने थोड्या प्रमाणात दूध उलटी द्वारे बाहेर काढणे हे खूप सामान्य असते जर तुम्ही बाळाचा ढेकर व्यवस्थित काढला तर उलटी करण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते.

काही वेळेस नवजात बाळ वारंवार उलटी करत असल्याने ते लगेच सुस्त पडून जाते व बरेचदा बाळ दिलेले दुध हे खूप जोराने उलटी द्वारे बाहेर काढते व बाळ जर हिरव्या रंगाच्या उलट्या करत असेल तर लगेच आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते कारण अशावेळी बाळाच्या जीवाला धोका असतो.

बाळाच्या त्वचेवर रॅश येणे

बाळाच्या त्वचेवर लाल रंगाचे चट्टे असतात. मुख्यतः गालांवर ही रॅश अचानक बाहेरच्या वातावरणाशी संपर्कात आल्याने आलेली असते. काही जागेवर बाळाची त्वचा ही कोरडी पडलेली असते. अशा वेळेस खालील नवीन त्वचा येण्यास सुरुवात झाल्यावर कोरडी त्वचा निघून जाते यासाठी उपचाराची गरज नसते.

ती रॅश काही दिवसात कमी होते. बाळाला कोणतीही क्रीम किंवा लोशन लावू नये.

बाळाच्या टाळूवर पापडी तयार होणे

बाळाच्या टाळूवर काही वेळेस पिवळ्या रंगाची पापडी तयार होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे जन्मावेळी आईच्या रक्तातून हार्मोन्स बाळाच्या रक्तात येतात. त्यामुळे बाळाच्या टाळूवरील ग्रंथी जास्त प्रमाणात तेल सोडतात. त्यामुळे टाळूवर फंगल इन्फेक्शन तयार होते त्याला क्रेडल कॅप असे म्हणतात.

आपल्या समाजात असा समज आहे की पुढच्या टाळूवर जास्त प्रमाणात तेल लावल्याने तो भरून येतो. परंतु हा शुद्ध गैरसमज आहे.

टाळू हा वयाच्या बारा ते अठरा महिन्यातच भरून येतो त्यामुळे असे करणे टाळावे असे केल्याने टाळूवरील फंगल इन्फेक्शन अजुन वाढते टाळूवरील पापडी जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे वर जखम होऊ शकते. जर ती पापडी कमी होत नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

जांघेत लाल चट्टे येणे

दूध पिण्यास सुरुवात केल्यावर बाळाचे लघवी व शी करण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी तुम्ही बाळाच्या जांगेतील जागा स्वच्छ कापडाने कोरडी करणे महत्त्वाचे असते.

मलमूत्रातील काही पदार्थांमुळे बाळाच्या त्या भागावरील त्वचेवर रिॲक्शन होऊन ती त्वचा लाल होत असते. त्यामुळे ती त्वचा कोरडी केल्यावर तुम्ही अँटी-फंगल पावडर वापरणे आवश्यक असते.

जर बाळाच्या गुदद्वाराजवळच्या भागाला जास्त प्रमाणात चट्टे आले असतील व बाळ खूप पातळ शी करत असेल तर आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

कानाला वारंवार हात लावणे

बाळांना कानामध्ये संसर्ग होणे हे खूप सामान्य आहे अशा वेळी बाळाच्या कानामध्ये चुण -चुण होत असल्याने बाळ कान खाजवत असते.

जर कानातील संसर्ग हा विषाणूंमुळे असेल तर तो काही दिवसात उपचार न घेता ठीक होतो.

परंतु संसर्ग हा जिवाणूमुळे झालेला असेल तर अशा वेळेस अँटिबायोटिक औषध लागू शकते

कानात संसर्ग झाल्याने बाळाला बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो म्हणून कानांमधून घाण पाणी बाहेर येत असेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे महत्त्वाचे असते.

तोंडामध्ये पांढरे चट्टे येणे

बाळाच्या तोंडात जर पांढरे चट्टे दिसून येत असतील तर बाळाला तोंडाचे फंगल इन्फेक्शन झालेले असू शकते. या फंगल इन्फेक्शनला कॅंदिडियासिस असे म्हणतात. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक असते. ते बाळाला तोंडात लावण्यासाठी काही औषध देऊ शकतात.

बाळ निळे पडणे

नवजात बाळ जेव्हा जन्माला येते त्यावेळेस बाळाचे हात पाय निळे पडलेली असतात व काही वेळात बाळाचा रक्तप्रवाह सुरळीत झाला की ते गुलाबी रंगाचे दिसण्यास सुरुवात होते. ही गोष्ट सामान्य असते.

परंतु काही तास उलटून गेले तरी बाळाचे ओठ सुद्धा निळे असतील,सोबत बाळाला श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर बाळाला हृदयाचा किंवा फुफ्फुसाचा विकार असू शकतो. अशावेळी विलंब न करता आपल्या बालरोग तज्ञांशी संपर्क करणे आवश्यक असते कारण अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या जीवाला धोका असतो.

बाळाला सर्दी होणे

बऱ्याचदा बाळ हे नवीन वातावरणात आल्याने बाळाला सर्दी होत असते. अशा वेळी बाळाचे नाक सर्दीने बंद पडत असेल तर सलाईनचे थेंब वापरून नाकातील घाण मोकळी केली पाहिजे. हे करून सुद्धा बाळ चिडचिड करत असेल व बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आपण बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

बाळाला खोकला येत असणे

बाळ हे दूध पीत असताना बरेचदा खोखलत असते परंतु हा खोकला सामान्य असतो. पण बाळाला खोकला येत असेल व बाळ दूध पीत नसेल किंवा बाळाला रात्रभर खोकला येत असेल, श्वास घेण्यात सुद्धा त्रास होत असेल म्हणजे जोरजोराने श्वास घेत असेल तर लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. अशावेळी बाळाला न्यूमोनियाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता असते.

बाळाला ताप येणे

नवजात बाळाला ताप येणे म्हणजे त्याला संसर्ग झालेला असू शकतो अशावेळेस बाळाचा ताप 100 डिग्री फॅरेनहाईटच्या वर असेल तर आपल्या बालरोग तज्ञांशी संपर्क करावा कारण काही वेळेस काही बाळांना तापात झटके येऊ शकतात.

बाळाचे हिमोग्लोबिन कमी असणे (अनेमिया) 

आईचे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर बाळाचे हिमोग्लोबिन सुद्धा कमी असू शकते अशा वेळेस बाळामध्ये ऑक्सिजनची कमी होते कारण हिमोग्लोबिन हे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते.जर बाळाच्या या विकाराकडे दुर्लक्ष केले तर बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.

बाळ वारंवार जुलाब करणे

नवजात बाळ हे सामान्यतः सात ते आठ वेळा जुलाब करतात. हे वेगवेगळ्या रंगाच्या जुलाब करू शकतात जर असे असून बाळ व्यवस्थित दूध पीत असेल तर काही काळजी करण्याचे कारण नसते.

परंतु जर जास्त प्रमाणात जुलाब होत असतील व बाळ सुस्त पडत असेल अशा वेळेस आपल्या बालरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा.

पालकांनी वरील सर्व समस्या जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्या वेळी डॉक्टरांशी संपर्क करावा व इमर्जन्सी मध्ये घरात काय उपचार करावा हे तुम्हाला समजले असेल. वरील लेख जर तुम्ही संपूर्णपणे वाचला तर तुमच्या बाळाला सांभाळण्याचा तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेयर करा.

4.7/5 - (3 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “लहान बाळांमधील 17 सामान्य आरोग्याच्या समस्या | 17 Newborn Baby problems in Marathi”

Leave a Comment