बाळ संध्याकाळी रडल्यावर काय करावे | Colic Pain in Baby in marathi

संध्याकाळी पोटात मुरडा येणे (Colic pain in baby in marathi) ही नवजात बाळांमध्ये खूप सामान्य समस्या असते. जवळपास ४०-५० टक्के बाळांमध्ये ही समस्या दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे बाळाच्या पोटात गॅस किंवा हवा अडकल्याने आतडे ओढले जातात व बाळाला पोटदुखीचा त्रास चालू होतो.

बाळ बोलू शकत नसल्यामुळे ते जोरजोरात रडण्यास सुरवात करते. हे रडणे अश्या प्रकारचे असते की कितीही प्रयत्न करा पण बाळ रडणे थांबवत नाही. मग घरातील सर्व मंडळी आई बाबा आजोबा आजी बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करतात तरीही बाळ काही शांत राहत नाही अश्या वेळेस बाळाचे पोट गॅस मुळे दुखत आहे असे समजावे.

बाळाच्या पोटात गॅस झाल्यामुळे जर बाळ रडत असेल तर त्याला कोलिक असे म्हणतात आणि असे रडणे हे जास्त करून संध्याकाळी दिसून येते त्यामुळे याला इव्हीनिंग कोलिक (Evening colic in marathi) असे म्हणतात.

कोलिक म्हणजे काय? (What is colic pain in baby in marathi?)

बाळ जर दिवसातून ३ तासांपेक्षा अधिक, ३ दिवसांपेक्षा जास्त, ३ आठवड्यापर्यंत जर सारखे रडत असेल तर त्याला कोलिक असे म्हणतात.

कोलिक हा आईचे दूध पिणाऱ्या, बाटलीने दूध पिणाऱ्या, मुलगा, मुलगी मध्ये सामान प्रकाराने होत असतो

बाळ कोणत्या कारणांसाठी रडत असते?

बऱ्याचदा बाळाला भूक लागली असेल, झोप येत असेल, सर्दी झाली असेल, कपडे ओले असतील किंवा काही चावले असेल तर बाळ रडू लागते.

 • बाळाला जर भूक लागली असेल तर बाळ त्याच्या रडण्याच्या भाषेत रडण्यास सुरवात करतात, अश्या रडण्याला हंगर क्राय असे म्हणतात. अश्या वेळेस बाळाला दूध पाजल्यानंतर बाळ शांतपणे खेळण्यास सुरवात करते किंवा झोपून जाते.
 • बाळाला जर झोप येत असेल तर बाळ चिडचिड करण्यास सुरवात करते. अश्यावेळेस बाळाला जवळ घेऊन गोंजारल्याने व कढेवर घेऊन फिरल्याने बाळ शांत होते व झोपून जाते किंवा घरात पाळणा असेल तर बाळाला पाळण्यात टाकल्यावर बाळ थोड्या वेळात झोपून जाते.
 • बाळाला जर सर्दी झालेली असेल तरी बाळ रडण्यास सुरवात करते अश्या वेळेस बाळाला सर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असतो आणि अश्या वेळी बाळाच्या नाकात सलाईनचे ड्रॉप टाकल्याने बाळाचा श्वास घेण्याचा त्रास कमी होतो व बाळ खेळण्यास सुरवात करते.
 • बाळाचे कपडे जर ओले झाले असतील तर बाळाला त्याचा त्रास होत असतो व बोलता येत नसल्याने बाळ रडायला लागते अश्या वेळेस बाळाचे कपडे बदल्यावर बाळाला चांगले वाटते व बाळ खेळण्यास सुरवात करते.
 • बाळाला अंथरुणात काही वस्तू किंवा काही चावले असेल तरी सुद्धा बाळ रडण्यास सुरवात करते अश्या वेळेस बाळाचे अंथरून झटकून घेणे आवश्यक असते त्यामुळे बाळाला होणार त्रास कमी होतो व बाळ शांतपणे खेळण्यास सुरवात करते.

वरील सर्व उपाय करून सुद्धा बाळ रडणे थांबवत नसेल तर ते रडणे हे कोलिक मुळे असू शकते

कोलिक ची लक्षणे काय असतात?

जेव्हा बाळाला कोलिक चा त्रास होतो तेव्हा खालील लक्षणे दिसून येतात

 • अचानक दूध पीत असतांना बाळ रडू लागणे
 • बाळाने मूठ घट्ट आवळणे, गुढगे पोटावर घेणे, पोट फुगलेले वाटणे.
 • रडणे थांबवण्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद न देणे.
 • दररोज ठराविक वेळेस रडणे ( शक्यतो संध्याकाळी )
 • जोरजोरात न थांबता रडणे

कोलिक ची मुख्य कारणे काय असतात?

 • बाळाला अपचन झालेले असणे, त्यामुळे बाळाच्या पोटात गॅस तयार होत असतो.
 • बाळाने जास्त दूध पिणे
 • बाळाने कमी दूध पिणे
 • बाळ दूध पीत असतांना पोटात हवा जाणे
 • बाळाचा ढेकर व्यवस्तीत काढलेला नसणे
 • आईच्या दुधातील काही पदार्थांची एलर्जी असणे
 • गरोदरपणात धूम्रपान करणे

बाळ संध्याकाळी जास्त रडत असेल तर काय करावे?

बाळ न थांबता रडत असल्याने घरातील सर्व मंडळी घाबरून न जातात परंतु असे न करता खालील उपाय करणे महत्वाचे असते.

 • बाळाला कढेवर  घेऊन मोकळ्या जागेत फिरवणे
 • बाळाजवळ जास्त लोकांनी गर्दी करणे टाळावे
 • बाळाला कढेवर घेऊन पाठीवर थोपटावे.
 • बाळाला पोटावर झोपवून पाठीवर थोपटावे.

वरील सर्व प्रयत्न करून सुद्धा बाळ रडणे थांबत नसेल तर आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

बाळाला बाटलीने दूध पाजणे शक्यतो टाळावे. जर बाळ बाटलीने दूध पीत असेल तर निप्पलचे छिद्र तपासून घेणे महत्वाचे असते जर छिद्र मोठे असेल तर पोटात हवा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाळ बाटलीने दूध पीत असेल तर बाटलीचे निप्पल व्यवस्थित तोंडात असल्याची खात्री करणे महत्वाचे असते. काही वेळेस निप्पल च्या बाजूने सुद्धा हवा पोटात शिरते. जे बाळ बाटलीने दूध पिते अश्या बाळांमध्ये कोलिक चा त्रास जास्त प्रमाणात असतो. म्हणून बाळाला स्वच्छ वाटी चमच्याने दूध पाजणे महत्वाचे असते.

बाळाला जर गॅस सोबत ताप, उलटी, हगवण होत असेल तर बाळाचे आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वेळ न घालवता बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

5/5 - (2 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment