सावधान जर नवजात बाळ जोराने उलटी करत असेल | Pyloric Stenosis in marathi

कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस (Congenital Hypertrophic Pyloric Stenosis in marathi) हा नवजात बाळांचा जठरातील पायलोरस या भागाचा आजार असतो. या आजाराची विशिष्ट लक्षणे असतात तसेच या आजाराकडे दुर्लक्ष झाले तर बाळाच्या जीवाला सुद्धा धोका असतो. त्यामुळे या आजाराची माहिती असणे फार महत्वाचे असते.

चला तर मग जाणून घेऊया कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस बद्दल योग्य ती माहिती. सर्वप्रथम जठराची रचना जाणून घेऊया.

जठराची रचना कशी असते?

बाळ जेव्हा दूध पीत असते त्या वेळेस ते तोंडातून अन्ननलिकेत जात असते व अन्ननलिकेचा पुढचा भाग हा जठर असतो. जठराचे चार भाग असतात. सुरवातीचा अन्ननलिकेशी जुडलेला भाग म्हणजे कार्डिया असतो. कार्डियाच्या पुढील भाग फंडस व त्यापुढील भाग बॉडी व शेवटचा भाग पायलोरस असतो.

पायलोरस हा भाग लहान आतड्यांशी जोडलेला असतो व तो एक व्हाल्व्ह चे काम करत असतो. त्यामुळे जठरातील अन्नाची पचनक्रिया झाल्यावर तो उघडतो व अन्न लहान आतड्यांकडे शिरते.

कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस म्हणजे काय? (Pyloric Stenosis in Marathi)

ज्या प्रकारे या आजाराचे नाव कंजनायटल आहे म्हणजे हा आजार जन्मतः असतो. हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस (Hypertrophic Pyloric Stenosis in marathi) म्हणजे जठरातील पायलोरस या भागावर असलेली सूज.

जन्मानंतर पायलोरस या भागावरील सूज वाढत जाते. त्यामुळे बाळ जेव्हा एक महिन्याचे होते तेव्हा बाळाने पिलेले दूध हे त्या भागावर सूज वाढल्याने तो मार्ग खूपच लहान होतो व त्यामुळे दूध लहान आतड्यांमध्ये शिरु शकत नाही व ते जठरताच जमा होत राहते त्यामुळे जठर पूर्णपणे भरून गेल्याने बाळाला उलटी होत असते.

जन्माला येणाऱ्या हजार बाळांमध्ये २-३ बाळांमध्ये हा आजार दिसून येतो. मुलांमध्ये हा आजार मुलींपेक्षा चार पटीने जास्त प्रमाणात दिसून येतो. आनुवंशिकतेमुळे सुद्धा हा आजार होत असतो.

कमी दिवसाच्या बाळांमध्ये हा आजार पूर्ण दिवसाच्या बाळांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो. आईने गर्भ असतांना धूम्रपान केलेले असल्यास हा आजार बाळामध्ये होण्याची शक्यता असते.

बाळ जेव्हा एक महिन्याचे होते त्या वेळेस या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारामध्ये बाळाला पुरेसा आहार मिऊळात नसल्याने व वारंवार होणाऱ्या उलट्यांमुळे बाळाची वाढ सामान्यपणे होऊ शकत नाही. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान व उपचार होणे फार महत्वाचे असते.

कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस ची लक्षणे काय असतात?

पायलोरिक स्टेनोसिस ची लक्षणे वयाच्या ३-४ आटवड्यापासून दिसून येतात तसेच ही लक्षणे ४-५ महिन्याच्या आत दिसून येत असतात. त्यामुळे या आजाराला इनफंटाईल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस (Infantile Hypertrophic Pyloric Stenosis in marathi) असे सुद्धा म्हणतात. पायलोरिक स्टेनोसिसची लक्षणे खालीलप्रमाणे असतात.

१) दूध पिल्यानंतर लगेच उलटी करणे – दूध पिल्यानंतर बाळ जोराने उलटी करत असते. ही उलटी दूरवर फेकली जात असते. सुरवातीला ही उलटी कमी प्रमाणात असते. परंतु पायलोरसचा मार्ग छोटा झाल्यावर उलटीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. उलटी ही पांढऱ्या रंगाची असते. वारंवार होणाऱ्या उलटीमुळे बाळाच्या शरीरातील सोडियम, पोटॅशियम असे क्षार तसेच जठरातील आम्ल याचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्यास सुरवात होते.

२) वारंवार भूक लागणे – बाळाने दूध हे पचत नसल्याने बाळाची भूक भागात नाही व बाळ नेहमी भुकेसाठी रडत राहते.

३) पोटावर जठराची हालचाल समजून येणे – बाळाला दूध पाजल्यानंतर तसेच बाळाला उलटी होण्याआधी त्याच्या पोटावर जठराची हालचाल दिसून येत असते. अश्या वेळेस जठरातील स्नायू जठरातील दुधाला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असतात.

४) शरीरातील पाणी कमी होणे – वारंवार होणाऱ्या उलट्यांमुळे व बाळाला मिळत नसलेल्या आहारामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरवात होते व बाळ सुस्त पडतात.

५) शौचास न होणे – बाळाला अन्नच पोहचत नसल्याने बाळाला शौचास होत नाही व त्यामुळे बाळाचे वजन वाढत नाही किंवा वजन कमी होते.

कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस चे निदान कसे करण्यात येते?

डॉक्टर बाळाला कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस (Congenital Hypertrophic Pyloric Stenosis in marathi) चे निदान हे त्याला असलेल्या लक्षणांवरून तसेच शारीरिक तपासणीवरून करत असतात. डॉक्टरांना पोटाच्या तपासणीवरून पोटाच्या वरच्या भागात गाठ असल्याचे समजून येते ही गाठ ऑलिव्ह फळाच्या आकारासारखी असते. तसेच बाळाला उलटी होण्याआधी किंवा दूध पाजल्यानंतर त्या भागावर लाटेसारखी हालचाल दिसून येते. यावरून डॉक्टर पायलोरिक स्टेनोसिस चे निदान करतात. तसेच निदानाची पुष्टी करण्यासाठी खालील प्रकारच्या तपासण्या करण्यात येतात.

१) रक्ताच्या तपासण्या – या तपासण्यांमध्ये बाळाच्या शरीरातील क्षार तसेच हिमोग्लोबिन व ऑपरेशनआधी आवश्यक असणाऱ्या तपासण्या करण्यात येतात.

२) पोटाची सोनोग्राफी – सोनोग्राफी मध्ये जठरातील पायलोरस हा भाग किती प्रमाणात वाढलेला आहे हे समजून येते.

३) पोटाचा एक्स रे – बाळाला बेरियम नावाचा विशिष्ट डाय पाजल्यानंतर बाळाच्या पोटाचा एक्स रे काढण्यात येत असतो. या एक्स रे मध्ये जठरातील पायलोरस या भागाजवळ अडथळा असल्याचे दिसून येत असतो. ही तपासणी जर शारीरिक तपासणी तसेच पोटाच्या सोनोग्राफीत निदान होऊ शकले नाही तर करण्यात येते.

कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिसचा उपचार काय असतो?

पायलोरिक स्टेनोसिस या आजाराचा कायमचा उपचार हा ऑपरेशनच असतो. परंतु ते करण्याआधी बाळाची तब्येत स्थिर करणे फार महत्वाचे असते कारण बऱ्याचदा हा आजार असलेले बाळ खूप सुस्त पडल्याने हॉस्पिटलमध्ये येत असते. त्यामुळे बाळाला ऑपरेशनसाठी फिट करणे फार महत्वाचे असते. त्यासाठी खालील प्रकारचा उपचार करण्यात येतो.

१) बाळाला सलाईन लावण्यात येते – बाळाच्या शरीरातील कमी झालेले पाणी तसेच कमी झालेले क्षार सामान्य होण्यासाठी बाळाला आवश्यक तेवढी सलाईन देण्यात येते. त्यामुळे बाळ ऑपरेशनसाठी फिट होते.

२) बाळाचे ऑपरेशन करण्यात येते – बाळ ऑपरेशनसाठी फिट झाल्यानंतर लहान बाळांचे सर्जन डॉक्टर हे ऑपरेशनविषयी संपूर्ण माहिती समजून सांगतात. ऑपरेशनआधी बाळाला तोंडाने दूध पाजायचे नसते कारण बाळाचे ऑपरेशन हे भूल देऊनच करण्यात येत असते. त्यामुळे भूल दिलेली असतांना बाळाला उलटी होण्याचा धोका टळतो.

भूल दिल्यानंतर सर्जन डॉक्टर बाळाच्या पोटावर चिरा मारल्यानंतर जठराच्या वाढलेल्या पायलोरस या भागावर आडवा चिरा मारतात. ज्यामुळे पायलोरसचा मार्ग मोकळा होतो व जठरातील दूध अडथळा न येता लहान आतड्यांमध्ये शिरते. नंतर बाळाच्या पोटावर मारलेला चिरा टाक्यांनी बंद करण्यात येतो. या ऑपरेशनला रामस्टेड पायलोरोमायोटॉमी असे म्हणतात.

ऑपरेशनसाठी एक ते दीड तास वेळ लागू शकतो. ऑपरेशननंतर बाळ दोन ते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहू शकते. ऑपरेशननंतर बाळाचे उलटी होण्याचे प्रमाण खूप कमी होते.

वेळेवर घेतलेला उपचार व निष्णात शिशूशल्यचिकित्सकाकडून ऑपरेशन केल्याने बाळाच्या जीवाला धोका टळतो. पायलोरोमायोटॉमी (pyloromyotomy in marathi) या ऑपरेशनचा यशस्वी होण्याचा दर चांगला असतो व बाळाला भविष्यात याचा त्रास होत नसतो. ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला पाळावा. बाळाने पिलेले दूध पचण्यास सुरवात झाल्याने बाळाचे वजन पुढच्या काही दिवसातच वाढण्यास सुरवात होते.

वरील कंजनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस चा लेख तुम्हाला आवडला असेल व तुम्हाला काही मूल्यवान माहिती मिळाली असेल तर ही माहिती नक्की शेयर करा.  

3.5/5 - (4 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

Leave a Comment