लहान मुले ही बऱ्याचदा खेळत असतांना अचानक शांत पडून राहतात व त्यांना उलट्या व पोटात दुखणे सुरुवात होते व काही खाण्यास दिल्यावर बाळ लगेच उलटी करत असेल अशावेळी तुमच्या बाळाला इंटूससेप्शन (Intussusception in marathi) झालेले असू शकते.
असे काही अचानक आपल्या बाळाला झाल्यामुळे आई-वडील घाबरून जातात पण असे न करता लगेच आपल्या बालरोग तज्ञांशी संपर्क करणे आवश्यक असते.
चला, तर मग या लेखामध्ये इंटूससेप्शन विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. जेणेकरून अशा परिस्थितीत तुम्ही काय करावे हे तुम्हाला समजून येईल.
इंटूससेप्शन म्हणजे काय ? (What is intussusception in marathi?)
इंटूससेप्शन हा आतड्यांचा गंभीर आजार असतो. या आजारात पोटातील लहान आतडे हे मोठ्या आतड्यामध्ये शिरत असते त्यामुळे आतड्यांचा त्या भागामध्ये अडथळा निर्माण होतो व पचलेले अन्न पुढे सरकू शकत नाही. मोठ्या आतड्यामध्ये लहान आतडे फसल्यामुळे लहान आतड्याचा रक्तपुरवठा बंद होण्यास सुरुवात होते.
जास्त वेळ हे लहान आतडे फसून राहिले तर त्याचा रक्तपुरवठा बंद झाल्याने तो भाग कुजू लागतो. गॅंग्रीन तयार होते म्हणून असे इंटूससेप्शन ही एक प्रकारची इमर्जन्सी असते. यामध्ये वेळेवर उपचार झाला तर बाळाचा जीव वाचवता येतो.
तीन महिने ते तीन वर्षातील मुलांमध्ये इंटूससेप्शन चा अडथळा येण्याचे कारण सामान्य असते. नवजात बालकांमध्ये हे प्रमाण कमी प्रमाणात दिसून येते तसेच मोठी मुले, माणसांमध्ये सुद्धा इंटूससेप्शन होऊ शकते. जवळपास एक हजारमुलांमागे दोन ते तीन मुलांमध्ये इंटूससेप्शन होऊ शकते .
मुलांमध्ये हा आजार मुलींपेक्षा चार पटीने जास्त प्रमाणात दिसून येतो.
इंटूससेप्शन होण्यामागचे कारण काय असते ? (What are causes of intussusception in marathi?)
इंटूससेप्शन होण्याचे कारण काही स्पष्ट नसते. काही मुलांमध्ये, कुटुंबात कोणाला हा त्रास आधी झालेला असेल तर इंटूससेप्शन होण्याचे प्रमाण जास्त असते. काही वेळेस मुलाला
- विषाणूचा संसर्ग झालेला असेल
- पोटात गाठ तयार झालेली असेल
- अपेंडिक्स चा संसर्ग झालेला असेल
- सिस्टिक फायब्रोसिस नावाचा आजार असेल
तर इंटूससेप्शन होऊ शकते.
इंटूससेप्शनची लक्षणे काय असतात ? (What are symptoms of intussusception in marathi?)
इंटूससेप्शनची लक्षणे जाणून घेणे फारच महत्त्वाची असतात कारण जर पालकांना लक्षणे लक्षात आली व पालकांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर लवकर निदान होते व वेळीच उपचार झाल्याने बाळाच्या जिवाचा धोका टळतो.
प्रत्येक बाळाची लक्षणे वेगवेगळी असू शकतात परंतु सर्वात सामान्य लक्षण म्हणजे
- खेळता-खेळता अचानक जोरात रडण्यास करणे सुरुवात करणे हे असते.
- अचानक खूप पोट दुखत असल्यामुळे असते .
ही लक्षणे दिसून येणेआधी बाळ शांत असते व खेळत असते.
- वारंवार उलटी होणे
आतड्यांमध्ये अडथळा आल्यामुळे लहान मुले उलटी करण्यास सुरुवात करतात. बाळाला तोंडाने काही खाण्यास दिल्यावर सुद्धा बाळ उलटी करते, त्याला पचत नाही. काही वेळेस हिरव्या रंगाच्या उलट्या सुद्धा होऊ शकतात.
- ताप येणे
आतड्यांमध्ये अडथळा आल्याने त्या भागात संसर्ग होण्यास सुरुवात होते व वारंवार उलटी झाल्याने बाळाच्या शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे बाळाला ताप येत असतो.
- बाळ सुस्त पडणे
बाळाला वारंवार उलट्या झाल्यामुळे बाळाच्या शरीरातील क्षार व पाणी कमी होते त्यामुळे बाळ थकून जाते व सुस्त पडून राहते.
- बाळाच्या शी मधून रक्त येणे
आतड्यांमध्ये आतडे फसल्यामुळे तेथे काही प्रमाणात रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते, त्यामुळे बाळाच्या शी मध्ये रक्त दिसून येते.
- पोटावर सूज येणे
आतड्यांमध्ये अडथळा आल्याने त्यावर सूज येण्यास सुरुवात होते त्यामुळे आपल्या बाळाच्या पोटावर सूज आलेली दिसते.
बाळ सुस्त पडणे, शी मध्ये रक्त येणे, पोटावर सूज येणे ही सर्वात गंभीर लक्षणे असतात. अशा वेळी लगेच आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.
इंटूससेप्शनचे निदान कसे करण्यात येते ? (How intussusception is diagnosed in marathi?)
इंटूससेप्शन हे गंभीर आजार असल्याने व त्यामुळे बाळाच्या जीवाला धोका असल्याने त्याचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे असते.
सर्वप्रथम डॉक्टर हे पालकांनी सांगितलेल्या लक्षणांवरून व बाळाच्या तपासणीवरून बाळाला इंटूससेप्शनचे निदान करतात. निदानाची पुष्टी करण्यासाठी खालील प्रकारच्या तपासण्या करण्यात येतात.
- रक्ताची तपासणी
रक्तामध्ये काही जंतू संसर्ग झालेला आहे का? हे तपासण्यासाठी रक्ताची तपासणी करण्यात येते
- पोटाचा एक्स-रे
पोटाच्या एक्स-रे वरून त्यामधे काही अडथळा आलेला आहे का? हे समजून येते.
- पोटाची सोनोग्राफी
पोटाच्या सोनोग्राफीमध्ये आतड्यांमध्ये कोणत्या ठिकाणी अडथळा आलेला आहे हे समजून येते.
- बेरियम एनिमा
बेरियम एनिमाचा वापर हा त्यांच्या निदानासाठी व उपचारासाठी सुद्धा होतो परंतु बाळाला जर आतड्यांमध्ये संसर्ग झालेला असेल तर बेरियम एनिमा काही वेळेस धोक्याचा ठरू शकतो.
लहान मुलांमध्ये इंटूससेप्शनचा उपचार कसा करण्यात येतो ? (What is treatment of intussusception in marathi?)
लहान मुलांमध्ये इंटूससेप्शनचा उपचार हा रुग्णाच्या प्रकृतीवर अवलंबून असतो. या उपचारात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतड्यांमध्ये फसलेले आतडे सोडवणे. हे दोन प्रकारे करण्यात येऊ शकते.
सलाईन एनिमाने इंटूससेप्शनचा उपचार – हायड्रोस्टॅटीक रिडक्शन ऑफ इंटूससेप्शन (Hydrostatic Reduction of Intussusception)
जर बाळाची प्रकृती गंभीर नसेल व त्याला जास्त संसर्ग झालेला नसेल अशा वेळी सर्जन डॉक्टर बाळाच्या गुरुद्वारातून नळी टाकून त्यातून सलाईन एनिमा देतात. त्यामुळे मोठ्या आतड्यामध्ये फसलेल्या लहान आतड्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात होते व ते मोठ्या आतड्यापासून मोकळे होते. या प्रक्रियेला हायड्रोस्टॅटिक रिडक्शन ऑफ इंटूससेप्शन असे म्हणतात. हे आतडे मोकळे झाल्यानंतर पुढील चोवीस तासात पुन्हा इंटूससेप्शन होण्याची शक्यता असते.
जर बाळ पुढील चोवीस तास स्वस्थ राहिले व त्याची पुन्हा केलेली सोनोग्राफी ही जर सामान्य आली तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो .ही प्रक्रिया यशस्वी झाल्यावर लगेच बाळाचा पोटदुखीचा त्रास कमी होतो व ऑपरेशनची गरज पडत नाही.
ऑपरेशन करून- Intussusception Laparotomy Surgery
जर सलाईन एनिमा देऊन झाले इंटूससेप्शन कमी झाले नाही किंवा आतड्यांमध्ये आतडे फसून बराच वेळ गेलेला असेल तर लॅप्रोटॉमी म्हणजे ओपन सर्जरी करण्यात येते.
या ऑपरेशनमध्ये पोट उघडून कोणत्या ठिकाणी आतड्यांमध्ये आतडे फसलेले आहे हे शोधले जाते व ते फसलेले आतडे एकमेकांपासून अलग करण्यात येते .
जर आतड्याचा भाग कुजलेला असेल तर तो काढून टाकण्यात येतो व आतडे एकमेकांना टाक्यांनी शिवण्यात येतात.जर आतड्याचा मोठा भाग कुजलेला असेल अशावेळी तो काढून टाकण्यात येतो परंतु अशा वेळेस लहान आतड्याचा भाग हा पोटावर काढण्यात येतो याला इलिओस्टामी असे म्हणतात
जेणेकरून बाळाची पचन प्रक्रिया चालू राहील अशा वेळी बाळाचा मल हा त्या भागातून बाहेर येत असतो व काही दिवसांनी हा लहान आतड्याचा भाग पुन्हा मोठ्या आतड्याशी जोडण्यात येतो जेणेकरून बाळाची शी पुन्हा गुदद्वारातून बाहेर येते.
वरील ऑपरेशन हे एक इमर्जन्सी असते कारण बाळाच्या जीवाला धोका असतो या ऑपरेशन आधी बाळाला उपाशी ठेवावे लागते. त्यामुळे त्याला सलाईन लावण्यात येते हे ऑपरेशन संपूर्ण भूल देऊनच करण्यात येते. ऑपरेशन नंतर सुद्धा बाळाला तीन ते चार दिवस बाळाच्या परिस्थितीनुसार उपाशी ठेवण्यात येते. त्यासाठी बाळाला 24 तास त्याच्या वजनाप्रमाणे सलाईन देण्यात येते जेणेकरून बाळ सुस्त पडणार नाही.
पोटातील संसर्ग कमी होण्यासाठी अँटिबायोटिक इंजेक्शन व दुखणे कमी राहण्यासाठी सुद्धा इंजेक्शन चालू असतात. जोपर्यंत बाळाचे आतडे काम करण्यास सुरुवात करत नाही व टाके व्यवस्थित भरून येत नाही तोपर्यंत बाळाच्या नाकातून नळी टाकलेली असते जेणेकरून पोटातील पित्त होणे उलटी मुळे छातीत जाऊ शकत नाही.
ऑपरेशन नंतर बाळाला कमीत कमी पाच दिवस दवाखान्यात भरती राहावे लागते.
इंटूससेप्शन चे काय कॉम्प्लिकेशन असतात ? (What are complications of intussusception in marathi?)
इंटूससेप्शन ही एक इमर्जन्सी असते, अशा वेळी बाळाच्या जीवाला धोका असतो . इंटूससेप्शन मध्ये खालील कॉम्प्लिकेशन होतात.
1 .आतड्यांमध्ये संसर्ग होणे. (Sepsis)
2,आतडे फाटून जाणे. (Intestinal Perforation)
3 आतडे फाटल्याने संपूर्ण पोटात संसर्ग पसरणे. (Peritonitis)
बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न
इंटूससेप्शन मध्ये बाळाची शी कशी दिसते ?
जर बाळाला झाले असेल तर त्याची शी लाल रंगाची व चिकट होते. तसेच अश्या प्रकारची शी डिसेंटेरी मध्ये सुद्धा होते म्हणून डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे फार महत्वाचे असते.
इंटूससेप्शन हा आजार बरा होतो का ?
वेळेत उपचार घेतला तर ऑपरेशन विना हा आजार बरा होऊ शकतो. पण आतड्यात आतडे फसून जास्त वेळ झालेला असेल तर पोट उघडून ऑपरेशन करावे लागत असते ज्याला लॅपरोटॉमी सर्जरी असे म्हणतात.
ऑपरेशन झाल्यानंतर बाळाचा आहार कसा असावा?
ऑपरेशन झाल्यानंतर बाळाला नियमित नेहमीचा आहार द्यावा. त्यात काही पथ्य नसते.
इंटूससेप्शन साठी वेळेत उपचार का घ्यावा?
उपचार घेण्यासाठी जेवढा वेळ आपण लावू तेवढे बाळाच्या जीवाला धोका वाढतो व विना ऑपरेशन सुद्धा फासलेले आतडे काढता येत नाही म्हणूनच पालकांनी मुलाला लक्षणे दिसून आले की शिशूशल्यचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
इंटूससेप्शन ऑपरेशन विना बरे होते का?
बरेचदा ऑपरेशन विना इंटूससेप्शन बरे होऊ शकते अश्या वेळेस त्याला इंटरमीटट इंटूससेप्शन (Intermittant Intussusception) असे म्हणतात.
Ref – Radiopedia
1 thought on “लहान मुलांमध्ये आतड्यात आतडे फसले तर काय करावे | Intussusception in marathi”