आतड्यामध्ये अडथळा आला तर काय करावे | Intestinal Obstruction in Marathi

आतड्यात अडथळा (Intestinal obstruction in marathi) येणे ही एक प्रकारची इमर्जन्सी असते. अश्या वेळेस रुग्णाला लवकरात लवकर सर्जन डॉक्टर ला दाखवणे फार महत्वाचे असते.

आपण जेव्हा अन्न तोंडमार्फत ग्रहण करतो तेव्हा ते तोंडातून अन्ननलिकेत जात असते. अन्ननलिकेतून तेच अन्न पचन होण्यासाठी जठरात, जठरातून लहान आतड्यांमध्ये, लहान आतड्यांतून मोठ्या आतड्यांमध्ये व मोठ्या आतड्यातून गुदाशयात व तेथून गुदद्वारामार्गे बाहेर येत असते.

अन्न नेहमी हळूहळू २५ ते ३० फूट लांब असलेल्या लहान व मोठया आतड्यांमधून पुढे सरकत असते.आतड्यांच्या याच मार्गात जर अडथळा आला तर त्याला इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन (Intestinal Obstruction in marathi) (आतड्यांतील अडथळा) असे म्हणतात. ही एक प्रकारची इमर्जनसी असते. चला तर मग जाणून घेऊया इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन बद्दल आवश्यक ती माहिती.

Table of Contents

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय? (What is intestinal obstruction in marathi?)

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे लहान किंवा मोठ्या आतड्यात येणार अडथळा असतो. हा अडथळा अर्धवट किंवा पूर्ण असू शकतो. आतड्यात अडथळा आल्याने त्यातील अन्न, गॅस अडथळा असलेल्या जागेच्या आधी जमा होण्यास सुरवात होते व आतड्याच्या त्या भागातील दबाव वाढत राहिल्याने आतडे फुटण्याची शक्यता असते. आतडे जर फुटले तर त्याला इंटेस्टिनल परफोरेशन असे म्हणतात.

आतडे फुटल्याने आतड्यांमधील मल हा पोटात पसरतो व पोटात संसर्ग तयार होतो. यामुळे इमर्जन्सी सुद्धा वाढते व बाळाच्या जीवाला धोकासुद्धा वाढतो. लहान आतड्यामध्ये अडथळा येण्याचे प्रमाण मोठ्या आतड्यांपेक्षा चार पटीने जास्त असते.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होण्याची कारणे काय असतात? (What are causes of intestinal obstruction in marathi?)

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होण्याची कारणे यांत्रिक तसेच गैरयांत्रिक असू शकतात.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनची यांत्रिक कारणे

यांत्रिक कारणे

यांत्रिक करणे म्हणजे आतड्यांना अडथळा मधून किंवा बाहेरून सुद्धा असू शकतो.

१) अधेजन्स – बाळाच्या पोटाचे आधी ऑपरेशन झालेले असेल तर पोटात तयार होणाऱ्या तंतुमय भाग आतड्यात अडथळा आणू शकतो.

२)  इंटुससेप्शन – यात आतड्यांमध्ये आतडे फसले असल्याने आतड्यांमध्ये अडथळा येत असतो. या आजाराला इंटुससेप्शन असे म्हणतात

३)  व्हॉव्ह्यूलस – आतड्यामध्ये पीळ पडला असल्याने आतड्यात अडथळा येत असतो.

४)  हर्नियाहर्नियात आतड्यांचा काही भाग पोटाच्या कमजोर झालेल्या भागातून बाहेर येत असते. काही वेळेस या भागात आतडे फासून गेल्याने त्यात अडथळा येत असतो.

५)  फॉरेन बॉडी (वस्तू) फसल्याने – काही वेळेस बाळ तोंडातून काही वस्तू गिळून घेत असतात. ती आतड्यामध्ये फसल्याने सुद्धा आतड्यात अडथळा येऊ शकतो.

६) आतड्यांमध्ये गाठ असल्याने – आतड्यांमध्ये गाठ तयार होत असल्याने आतड्यांमध्ये अर्धवट अडथळा येऊ शकतो.

७) आतड्यांमध्ये मल फसल्याने – नवजात बाळांमध्ये आतड्यात मेकोनियम (सुरवातीचा मल) फसलेला असल्याने आतड्यांमध्ये अडथळा येत असतो.

गैरयांत्रिक कारणे –

लहान आतडे व मोठे आतडे हे समन्वयाने काम करत असतात. काही आजारांमध्ये या समन्वयात अडचण येत असते. त्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा येत असतो.

१)     पूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल तर

२)     बाळाला जुलाब लागलेले असतील तर

३)     शरीरातील शार असंतुलित झाले असतील तर

काही आजारांमध्ये हा अडथळा बऱ्याच दिवसांपासून असतो

१)    हर्षप्रांग डिसीज – या आजारात मोठ्या आतड्यांमधील मज्जातंतू विकसित झालेले नसल्याने अडथळा येत असतो. हर्षप्रांग डिसीज आजारात मोठ्या आतड्यातील मज्जातंतू पूर्णपणे विकसित झालेल्या नसल्याने पोटातील मल पुढे सरकण्यास अडथळा येत असतो.

अश्या बाळांमध्ये मल पूर्णपणे मोठ्या आतड्यात फासून राहतो व मोठे आतडे फुगण्यास सुरवात होते. जेव्हा आतड्याचा ताण खूप जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेस ते फुटू शकते. त्यामुळे ही सुद्धा एक प्रकारची इमर्जन्सी असते.

२)    हायपोथायरॉईडीसीम – या आजारात बद्धकोष्टता होत असल्याने आतड्यात अडथळा येऊ शकतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनची लक्षणे काय असतात? (What are symptoms of intestinal obstruction in marathi?)

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनची लक्षणे ही आतड्यामध्ये कोणत्या भागात अडथळा आहे त्यावर अवलंबून असतात.

लहान आतड्यांमध्ये अडथळा असेल तर उलटी हे सर्वप्रथम लक्षण असते.

मोठ्या आतड्यांमध्ये अडथळा असेल तर पातळ जुलाब होणे हे लक्षण दिसून येत असते व सोबत उलटी सुद्धा होत असते.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन ची काही लक्षणे खालील प्रमाणे असतात

 • पोट फुगून येणे
 • पोटात दुखून येणे
 • मळमळ होणे
 • उलटी होणे
 • पोटातील गॅस बाहेर न पडणे
 • भूक कमी होणे

एका वर्षाखालील बाळांमध्ये आतड्यांमध्ये अडथळा येत असेल तर खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात

 • पोट फुगलेले असते
 • बाळ स्वतःचे गुढघे पोटावर घेत असते
 • हिरव्या रंगाची उलटी होणे
 • ताप येणे
 • पोटदुखीमुळे बाळ कण्हत असते
 • बाळ सुस्त पडते
 • जोरजोराने रडणे
 • बाळाची शी लालसर रंगाची असणे

वरील कोणतेही लक्षणमुलांमध्ये दिसून आले तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक असते अश्या परिस्थितीत बाळाच्या जीवाला धोका असतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनचे निदान कसे करण्यात येते?

डॉक्टर बाळाला इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन चे निदान बाळाच्या शारीरिक तपासणीवरून करतात. तसेच हे निदान निश्चित करण्यासाठी खालील तपासण्या करण्यात येऊ शकतात.

 • पोटाचा एक्स रे – पोटाच्या एक्स रे मध्ये आतड्यांमध्ये असलेला अडथळा समजून येत असतो. जठराच्या शेवटच्या भागात अडथळा असेल तर एक्स रे मध्ये सिंगल बबल दिसत असतो. लहान आतड्यातील सुरवातीच्या भागात अडथळा असेल तर एक्स रे मध्ये डबल बबल दिसत असतो. तसेच लहान आतड्यातील शेवटच्या भागात अडथळा असेल तर ट्रिपल बबल दिसत असतो.
 • रक्ताच्या तपासण्या – रक्ताच्या तापन्यांमध्ये हिमोग्लोबिनची तपासणी, रक्तातील पेशींची तपासणी, यकृत व किडनीचे कार्य समजण्याच्या तपासण्या व रक्तातील क्षार तपासण्यात येतात.
 • सिटी स्कॅन – सिटी स्कॅन मध्ये आतड्यांमध्ये कोणत्या भागात अडथळा आहे व किती प्रमाणात आहे हे समजून येते.

इतर तपासण्या जसे बेरियम इनेमा किंवा क्वचित कोलोनोस्कोपी (Colonoscopy in marathi) सुद्धा करण्यात येते. परंतु बऱ्याचदा हा आजार इमरजेंसी असल्याने एक्स रे व रक्ताच्या तपासण्या करून झाल्यावर ऑपरेशन चा निर्णय घेण्यात येत असतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन चा उपचार काय असतो? (What is treatment of intestinal obstruction in marathi?)

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन ही एक प्रकारची इमर्जन्सी असल्याने वेळेत उपचार घेणे फार महत्वाचे असते. त्यामुळे जीवाला धोका सुद्धा टळतो. इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन (Intestinal obstruction in marathi) असलेल्या रुग्णाला हॉस्पिटल मध्ये लगेच भरती करावे लागते.

आतड्यांमध्ये अर्धवट अडथळा असेल तर सलाईन, औषधी व नाकातून नळी टाकून आतड्यांना आराम दिल्याने हा त्रास कमी होत असतो. परंतु आतड्यांमध्ये पूर्णपणे अडथळा असला तर ऑपरेशन ची गरज पडत असते. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यावर रुग्णाच्या परिस्थितीनुसार उपचार करण्यात येतो.

१)  नाकातून नळी टाकण्यात येते – रुग्णाच्या नाकातून नळी टाकण्यात येत असते. ज्यामुळे अडथळा असलेल्या भागावरील पाणी व गॅस त्या नळीमार्फत बाहेर काढण्यात येतो.

२)  रुग्णाला उपाशी ठेवण्यात येते – रुग्णाच्या आतड्यांना आराम मिळावा, पुढील कॉम्प्लिकेशन होऊ नये व ऑपरेशनआधी भूल मध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून रुग्णाला उपाशी ठेवण्यात येते.

३)  सलाईन लावण्यात येते – रुग्णाला जरी उपाशी ठेवण्यात येत असले तर त्याच्या शरीराला आवश्यक इतकी सलाईन शिरेतून देण्यात येत असते व रुग्णाच्या शरीरातील क्षार संतुलित राहावे म्हणून सलाईन व इंजेक्शन चा वापर करण्यात येतो.

४)  शिरेतून आवश्यक ते औषध देण्यात येते – रुग्णाची मळमळ कमी होण्यासाठी, पोटदुखी कमी होण्यासाठी, तसेच पोटातील संसर्ग कमी होण्यासाठी शिरेतून इंजेक्शन देण्यात येतात.

५)  आतड्यातील अडथळा मोकळा करण्यासाठी ऑपरेशन करण्यात येते – पालकांनी समंती दिल्यानंतर सर्जन डॉक्टर आतड्यातील अडथळा मोकळा करण्यासाठी ऑपरेशन करतात. या ऑपरेशनला लॅपरॉटॉमी (पोट उघडून केलेले ऑपरेशन) असे म्हणतात. बाळाला पूर्णपणे भूल दिल्यानंतरच ऑपरेशन करण्यात येत असते.

ऑपरेशनमध्ये पोटात असलेल्या आतड्यांच्या परिस्थितीनुसार उपचार करण्यात येतो.

१)  आतडे एकमेकांना चिपकले असेल किंवा पूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जागेवर चिपकले तर तो अडथळा मोकळा करण्यात येतो.

२)  आतड्यांना पीळ पडला असेल तर तो सोडवण्यात येतो.

३)  आतड्यात आतडे फसले असल्यास (इंटूससेप्शन) ते एक्मेकांतून मोकळे करण्यात येते.  

४)   हर्निया झालेल्या भागातील फसलेले आतडे मोकळे करण्यात येते.

५)   काही वेळेस आतड्यांमधील अडथळ्यामुळे त्या भागातील रक्तप्रवाह बंद झाल्याने तो भाग सडण्यास (गॅंगरिन) सुरवात झालेली असते. त्यामुळे आतड्याचा सडलेला भाग काढून सामान्य आतडे परत एकमेकांना टाक्यांनी जोडण्यात येते.

६)   आतडे फाटलेले असेल तर त्या भागातील आतड्याचा भाग काढून सामान्य भाग एकमेकांना टाक्यांनी जोडण्यात येतो. आतडे फाटले असल्याने पोटात घाण जमा होत असते, ती घाण साफ करण्यात येते.

आतडे एकमेकांना जोडणे शक्य नसेल त्यावेळेस रुग्णाच्या पोटावर शी चा मार्ग काढण्यात येत असतो.

जर लहान आतड्याचा शेवटचा भाग पोटावर शी चा मार्ग म्हणून काढलेला असेल तर त्याला इलिओस्टोमी (Ileostomy in marathi) असे म्हणतात. तसेच जर मोठ्या आतड्याचा भाग पोटावर शी चा मार्ग म्हणून काढलेला असेल तर त्याला कोलोस्टोमी (Colostomy in marathi) असे म्हणतात. हा पोटावर काढलेला मार्ग काही महिन्यांनी पुन्हा ऑपरेशन करून बंद करण्यात येतो.

ऑपरेशन नंतर सुद्धा रुग्णाला ३-४ दिवस उपाशी ठेवण्यात येत असते. त्यासाठी बाळाच्या वजनाप्रमाणे दर २४ तासाला सलाईन देण्यात येत असते. रुग्णाच्या लघवीच्या मार्गात (कॅथेटर) नळी टाकण्यात येत असते जेणेकरून रुग्णाला वारंवार लघवीसाठी उठावे लागत नाही.

ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवसापासून नाकात टाकलेल्या नळीतून हिरव्या रंगाची घाण येण्यास सुरवात होते. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी हे प्रमाण कमी होते व आतड्यांचा टाके भरलेला भाग काम करण्यास सुरु झाल्याने बाळ शी करण्यास सुरवात करते म्हणून रुग्णाची हॉस्पिटल मधून सुट्टी करण्यात येते.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन मुले काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात?

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनमुळे खालील प्रकारचे कॉम्प्लिकेशन होत असतात

 • शरीरातील क्षार कमी जास्त होणे
 • शरीरातील पाणी कमी होणे
 • आतडे फाटणे
 • पोटात संसर्ग पसरणे
 • रक्तामध्ये संसर्ग पसरणे
 • किडनी निकामी होणे
 • शरीरातील अवयव निकामी होणे
 • जीव गमावणे

बाळाला इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन (intestinal obstruction in marathi) होणे हे पालकांसाठी खूप वेदनादायी असू शकते. परंतु योग्य वेळेत निदान होणे व उपचार मिल्ने फार महत्वाचे असते. योग्य वेळेत घेतलेला योग्य निर्णय तुमच्या मुलाचे आयुष्य वाचवू शकतो.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होण्याचे सामान्य कारण काय असते?

अधेजन्स हे खूप सामान्य कारण असते व जास्तकरून ज्यामुलांमध्ये पूर्वी पोटाचे ऑपरेशन झालेले आहे त्या ठिकाणी पोटातील आतडे चिपकल्याने अडथळा येत असतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन झालेले असेल त्या वेळेस शी होऊ शकते का?

जास्तकरून इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन झालेले असेल तर रुग्णाच्या पोटातील गॅस तसेच मल पुढे सरकत नाही म्हणून शी होऊ शकत नाही. अडथळा कमी प्रमाणात असेल तर रुग्ण शी करू शकतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन मध्ये ऑपरेशन न करता रुग्ण जिवंत राहू शकतो का?

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन ऑपरेशन न करता तसेच राहू दिले तर आतडे फुटल्याने संसर्ग पोटात पसरल्याने ४-५ दिवसात रुग्ण दगावू शकतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन झालेले असेल तर गॅस पास होऊ शकतो का?

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन असल्याने गॅस सुद्धा पास होऊ शकत नाही.अश्या वेळेस आतड्यांमध्ये पूर्ण अडथळा आलेला असतो.

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन चे दुखणे किती तीव्र असते?

इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन चे दुखणे हे खूप तीव्र प्रमाणात असते त्यामुळे रुग्ण कण्हत असतो व शांत पडून राहतो.

वरील लेख मध्ये इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन (Intestinal Obstruction in marathi) बद्दल दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की गरजूंना शेयर करा कारण कोणावर अशी वेळ येईल हे सांगता येत नाही. वेळेत घेतलेला योग्य डॉक्टरकडून घेतलेला उपचार हा रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

5/5 - (1 vote)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “आतड्यामध्ये अडथळा आला तर काय करावे | Intestinal Obstruction in Marathi”

Leave a Comment