Danger newborn baby signs in Marathi : नवजात बाळाची व्यवस्थित काळजी घेणे फार महत्वाचे असते. पालकांना नवजात बाळामधील काही धोक्याच्या चिन्हांची माहिती असणे खूप आवश्यक असते. जर पालकांनी ते चिन्हे वेळेत ओळखली तर बाळाचा जीव वाचवता येऊ शकतो. चला तर मग या लेख मध्ये जाणून घेऊ अश्याच नवजात बाळाच्या काही समस्या.
बाळ सुस्त पडणे
बऱ्याचदया बाळ अंगावरचे दूध नीट पीत असते. बाळाला ताप आलेला असेल किंवा बाळाचे नाक सर्दीमुळे बंद पडलेले असेल तर बाळ दूध पिणे थांबवू शकते. जर बाळाने दूध पिणे थांबवले अथवा बाळाला दूध पिण्यास त्रास होत असला तर आपल्या बालरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा .
बाळाला श्वास घेण्यास त्रास होणे
बाळाला बऱ्याचदा सर्दी खोकला लागलेला असतो परंतु बाळाचा हा आजार जर जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असतो व बाळ जोर जोरात श्वास घेते. त्या सोबत जर छातीचे स्नायू बरगड्या मध्ये ओढले जात असतील तर त्वरित आपल्या बालरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा. बऱ्याचदा अश्या परिस्थितीत बाळाला छातीत संसर्ग (न्यूमोनिया) हृदय विकाराचा धोका असू शकतो. ही एक प्रकारची धोक्याची घंटा असते.
वारंवार उलटी होणे
अंगावरचे दूध (स्तनपान) प्याल्यानंतर बऱ्याचदा बाळ हे उलटीमधून दूध नाकाद्वारे ,तोंडाद्वारे बाहेर काढते त्यासाठी बाळाचा ढेकर काढणे महत्वाचे असते. ढेकर काढल्यानंतर थोडा वेळ उजव्या कुशीवर करून ठेवावे त्यामुळे उलटीचे प्रमाण कमी होते.
परंतु बाळ वारंवार हिरवी उलटी करत असेल, दूध पीत नसेल आणि जर पोटावर सूज असेल तर त्वरित आपल्या बालरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा. बाळाच्या आतड्यांमध्ये अडथळा असल्याने उलटी दूरवर फेकली जात असेल तर बाळाच्या जठरात अडथळा असण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत आपल्या बालरोग तज्ज्ञांशी त्वरित संपर्क करावा .
पातळ शी करणे
नवजात शिशु बऱ्याचदा दूध प्याल्यानंतर लगेच शी करते. काही बाळ दिवसातून १०/१२ वेळेस शी करतात. तर काही बाळ ३/४ दिवसातून एकदा शी करतात. त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते. परंतु बाळ १०/१२ वेळा शी करत असेल, दूध पित नसेल आणि सोबत उलट्या होत असतील आणि बाळ सुस्त पडत असेल, बाळाची शी ची जागा लाल पडली असेल तर काळजी करण्याचे कारण असते. अश्या परिस्थितीत आपल्या बालरोग तज्ज्ञांशी त्वरित संपर्क करावा .
लघवी कमी करणे
नवजात बाळ पहिल्या २४ ते ४८ तासात पहिली लघवी करते. परंतु बाळ जर सुरवातीच्या ४८ तासात लघवी करत नसेल तर हे चिंता करण्याचे कारण असते. बऱ्याचदा बाळ हे लघवी करतांना किंवा करण्याआधी रडत असते पण हे सामान्य असते. पण बाळ लघवी करताना रडत असेल व त्याला ताप असेल तर बाळाला लघवीचा संसर्ग असू शकतो.
मुलांमध्ये पोस्टेरीयर युरेथ्रल व्हॉल्व्हचा त्रास बाळाला असू शकतो. अश्या वेळेस या आजाराचे निदान वेळेत होणे फार महत्वाचे असते.
वजन कमी होणे
बाळ व्यवस्थित दूध पीत असून सुद्धा बाळाचे वजन कमी होत असेल किंवा बाळाचा टाळू खोल गेला असेल तर हे काळजीचे कारण असते. बाळाला अंगावरचे दूध कमी पडत असेल तरी सुघ्दा बाळाचे वजन कमी होऊ शकते. अश्या वेळेस आपली बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे फार महत्वाचे असते.
शरीराचे तापमान वाढणे
नवजात बाळाचे तापमान नियंत्रित असणे फार महत्वाचे असते. बाळाचा ताप थर्मोमीटर वर चेक करणे महत्वाचे असते. बाळाच्या शरीराचे तापमान जर कमी होत असेल किंवा १०० फॅरनहाईट च्या वर जात असेल तर बाळाला संसर्ग असू शकतो .अश्यावेळेस बाळाला त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखविणे गरजेचे असते.
बाळ काळे निळे पडणे
बाळाच्या अंगावर जर पिवळसरपणा असेल तर काळजी करण्याचे कारण असू शकते .बाळाला कावीळ असेल तर बाळाच्या अंगावर पिवळसरपणा येतो .जर तो पिवळसरपणा हात पायांच्या पंजापर्यंत असेल तर आपल्या डॉक्टरांना त्वरित दाखविणे महत्वाचे असते.
बऱ्याचदा कावीळ तिसऱ्या दिवशी दिसायला लागतो, पाचव्या दिवसांपर्यंत वाढतो व आठव्या दिवसांपर्यंत कमी होतो .परंतु कावीळ जर प्रथम दिवसापासून दिसत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा .
जर बाळ निळे काळे पडत असेल किंवा हात,पाय,ओठ निळे पडत असतील तर बाळाला श्वसनाचा, हृदयाचा विकार असण्याची शक्यता असते.अश्या वेळेस बाळाला त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखविणे गरजेचे असते.
बाळाला झटके येणे
बाळाला जर झटके येत असतील आणि बाळ डोळे फिरवीत असेल आणि मुठा आवळत असेल तर बाळाला त्वरित डॉक्टरांना दाखविणे महत्वाचे असते .
नाभीतून रक्त येणे
जर बाळाच्या नाभीजवळ लालसरपणा असेल किंवा बाळाच्या नाभीतून रक्त येत असेल अथवा घाण येत असेल तर बाळाला नाभीचा संसर्ग असू शकतो. अश्या वेळेस बाळाला त्वरित डॉक्टरांना दाखविणे महत्वाचे असते .
वेळेत केलेला उपचार कधीपण फायद्याचा असतो. त्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडे म्हणजे बालरोग तज्ज्ञाकडे बाळाला दाखवणे महत्वाचे असते. हुशार पालक आपल्या बाळाला असलेले लक्षणे ओळखून वेळेत उपचार नक्की घेतात.