लॅपरोस्कोपी एक दुर्बीण शस्त्रक्रिया |Laparoscopy in marathi

Laparoscopy in Marathi : आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा लॅपरोस्कोपी हा शब्द ऐकत असतो. आपल्या ओळखीच्या कोणा व्यक्तीचे ऑपरेशन झाले की काही वेळेस लॅपरोस्कोपी हा शब्द आपण ऐकतो आणि आपल्याला लॅपरोस्कोपी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया हेच माहीत असते. चला तर, मग या लेखामध्ये जाणून घेऊ या लॅपरोस्कोपी बद्दल आवश्यक असणारी माहिती

Table of Contents

Laparoscopy in Marathi

लॅपरोस्कोपी ही एक प्रकारची दुर्बीण शस्त्रक्रिया असते. यामध्ये बेंबीतून तसेच बेंबीच्या आजूबाजूने पोटात दुर्बीण टाकून पोटात असलेल्या आजाराचे निदान आणि उपचार करण्यात येते या शस्त्रक्रियेला मिनीमली इंव्हेजीव सर्जरी (Minimally invasive surgery) म्हणजे कमीत कमी चिरा लावण्यात येणारी शस्त्रक्रिया किंवा की व्होल सर्जरी (Key hole surgery) म्हणजे 0.3 से.मी ते 0.5 से.मी चिरा लावण्यात येणारी शस्त्रक्रिया सुद्धा म्हणतात.

लॅपरोस्कोपी ही लॅप्रोस्कोप या उपकरणाने करण्यात येते. लॅप्रोस्कोप हे नळीच्या आकाराचे उपकरण असते, ज्याला कॅमेरा वर लाईट सोर्स जोडलेला असतो. हा कॅमेरा हाई रेसोल्युशन कॅमेरा असतो. तसेच लाईट सुद्धा उच्च इंटेन्सिटीचा असतो.  त्यामुळे पोटातील अवयव तसेच आजाराची परिस्थिती स्क्रीनवर समजून येऊ शकते.

लॅपरोस्कोपी का करण्यात येते?

लॅपरोस्कोपी करण्याचे दोन मुख्य कारणे असतात.

1.       पोटातील आजाराचे निदान करण्यासाठी.

2.       पोटातील आजाराचा उपचार करण्यासाठी.

पोटातील आजाराचे निदान करण्यासाठी

आता तुमच्या मनात आले असेल की, आजाराचे निदान करण्यासाठी तर एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन अशा सुविधा उपलब्ध असतात तरी लॅपरोस्कोपीची गरज का पडते? बऱ्याचदा सुरुवातीला वरील तपासण्या करून सुद्धा निदान होत नसल्यास काही आजारात लॅपरोस्कोपी करण्याची गरज पडत असते.

  • एक्स-रे  – एक्स- रे मध्ये उत्सर्जित किरणांचा वापर करून पोटाचा फोटो काढण्यात येत असतो. आतड्यांमधील अडथडा ,मुतखडा अशा आजारांचे निदान एक्स- रे मध्ये होत असते.
  • सोनोग्राफी -या तपासणीमध्ये एका विशिष्ट उपकरणाने ध्वनिलहरी पोटात सोडण्यात येतात व त्यावरून पोटातील अवयवांची तपासणी करण्यात येते. सोनोग्राफी हे खूप उपयुक्त तंत्रज्ञान आहे. .त्यामुळे बऱ्याच आजारांचे निदान उत्सर्जित किरणांचा संपर्क न येता करण्यात येते.
  • सिटीस्कॅन– सिटीस्कॅन मध्ये शरीराच्या विविध भागांचे एक्स-रे काढण्यात येत असतात. व यात 300 एक्स-रे काढले जातील इतके उत्सर्जित किरणांचा वापर होत असतो.
  • एम आर आय– एम आर आय मध्ये चुंबकीय व रेडिओ लहरींचा वापर करून शहराच्या भागांचे फोटो काढण्यात येत असतात.

वरील सर्व तपासण्या करून सुद्धा आजाराचे निदान होत नसल्यास तसेच शारीरिक तपासणी वर डॉक्टरांना आजाराची शंका असल्यास लॅपरोस्कोपी करण्यास डॉक्टर सांगू शकतात.

लॅपरोस्कोपीमध्ये बऱ्याचदा बायोप्सी करण्यासाठी किंवा अवयवाचा तुकडा घेण्यासाठी करण्यात येते. लॅपरोस्कोपीमध्ये यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, अपेंडिक्स, प्लीहा, लहान आणि मोठे आतडे तसेच ओटीपोटातील अवयवांची तपासणी करण्यात येते व या तपासणीवरून वरील अवयवांमध्ये कोणता आजार आहे हे निदान करण्यात येते.

पोटातील आजाराचा उपचार करण्यासाठी

तपासणीवरून आजाराचे निदान झाले की त्या आजारावर उपचार लगेच करण्यात येतो.

खालील आजारांवर लॅपरोस्कोपी ने उपचार करण्यात येतो

1.       इंग्वायनल हर्निया

2.       खाली न आलेले अंडाशय 

3.       अपेंडिक्स काढण्यासाठी

4.       पित्ताशय काढण्यासाठी

5.       पोटातील गाठ काढण्यासाठी

6.       मेकल्स डाइव्हर्टिक्युलमच्या ऑपरेशनसाठी

7.       आतड्यातील गुंता सोडवण्यासाठी

8.       किडनी काढण्यासाठी (नेफरेक्टोमी)

9.       पायलोंप्लास्टी 

10.     अंडाशयाचे ऑपरेशन

लॅपरोस्कोपी कशी करण्यात येते?

लॅपरोस्कोपी रुग्णाला पूर्ण भूल देऊन करण्यात येते. पूर्ण भूल दिल्याने रुग्णाला ऑपरेशन वेळी दुखून येत नाही. भूल देण्याआधी रुग्णाच्या शिरेत इंट्राकॅथ लावण्यात येतो जेणेकरून ऑपरेशन आधी रुग्णाला ४-५ तास उपाशी राहावे लागत असल्याने त्यातून सलाईन लावण्यात येते व त्यातूनच भुलला इंजेक्शन देण्यात येतात. 

लॅपरोस्कोपी करण्यासाठी सर्जन डॉक्टर रुग्णाच्या पोटावर 0.5 mm इतके चिरा मारतात. या चिऱ्यातून पोटात लॅप्रोस्कोप सोडण्यात येतो या चिऱ्यातूनच पोटात CO2 गॅस सोडण्यात येतो. जेणेकरून पोट फुगते व पोटातील अवयव तपासणीसाठी अडचणी येत नाही. दुसऱ्या चिऱ्यातून लॅपरोस्कोपी करण्यास इतर उपकरण वापरण्यात येतात.

लॅप्रोस्कोपला कॅमेरा व लाइट सोर्स लावण्यात येतो. लाइट सोर्समुळे पोटातील अवयव स्पष्ट दिसून येतात. तसेच कॅमेऱ्याच्या मदतीने मोठ्या स्क्रीनवर ऑपरेशन मधील जागा दिसून येत असते. लॅप्रोस्कोपी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपकरणे बाहेर काढण्यात येतात व त्यासोबत पोटातील गॅस बाहेर येतो व पोटावरील  चिरे टाक्यांनी बंद करण्यात येतात.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला रूम मध्ये शिफ्ट करण्यात येते तसेच काही वेळ रुग्ण झोपेतच असतो

लॅपरोस्कोपी केल्यानंतर रुग्ण किती वेळात बरा होतो?

लॅपरोस्कोपी करण्यासाठी संपूर्ण भूल दिलेली असल्याने ऑपरेशन नंतर काही तास बाळाला उपाशी ठेवण्यात येत असते. तसेच त्याच्या हृदयाची गती, स्वशनाची गती व ऑक्सिजन यावर लक्ष ठेवण्यात येत असते. बऱ्याचदा लॅपरोस्कोपी ऑपरेशन नंतर बाळाला लगेच काही तासातच सुट्टी मिळू शकते.

परंतु बाळाचा आजार मोठा असल्यास बाळाला हॉस्पिटल मध्ये जास्त दिवस ऍडमिट राहावे लागू शकते. ऑपरेशन नंतर काही दिवस चिरा असलेल्या ठिकाणी दुखून येत असते त्यासाठी डॉक्टरांनी दुखणे कमी होण्यासाठी औषधी दिलेली असतात.

बऱ्याचदा लॅपरोस्कोपी झाल्यानंतर खांदे दुखून येत असतात याचे मुख्य कारण पोटात सोडलेल्या गॅस मुळे पोटातील डायफ्रॅम हा स्नायू ओढला जातो व त्याचे मज्जातंतू खांद्याच्या स्नायूंशी जोडलेले असतात त्यामुळेच खांदे दुखून येतात. हे दुखणे २-३ दिवसात कमी होते. लहान मुळे लॅपरोस्कोपी ऑपरेशन नंतर मोठ्या माणसांपेक्षा लवकर बरे होतात.

लॅपरोस्कोपी मुळे कोणत्या समस्या येऊ शकतात ?

लॅप्रोस्कोपी हे एक प्रकारचे सुरक्षित ऑपरेशन असते. क्वचितच लॅपरोस्कोपी ऑपरेशन नंतर समस्या येत असतात. जवळपास हजार पेशंटपैकी २-३ पेशंट ला अश्या समस्या येतात. ऑपरेशनच्या जागेवर संसर्ग होणे, रक्तश्राव होणे, उलटी येणे, अश्या सामान्य समस्या तसेच ताप येणे, पोटातील अवयवाला इजा होणे, मोठ्या धमनीला इजा होणे, ऍनेस्थेशिया मुळे ऍलर्जी रिअक्शन येणे अश्या प्रकारच्या गंभीर समस्या होऊ शकतात

लॅपरोस्कोपी ऑपरेशन करण्याचे फायदे काय असतात?

लॅपरॉटॉमी ऑपरेशन पेक्षा (पोटावर मोठा चिरा मारून केलेले ऑपरेशन) लॅपरोस्कोपी ऑपरेशन चे खूप फायदे असतात. लॅपरोस्कोपी ऑपरेशन चे फायदे खालीलप्रमाणे असतात

  • रुग्ण लवकर बरा होतो
  • दुखणे खूप कमी प्रमाणात असते
  • खूप छोटे चिरे मारलेले असतात
  • संसर्ग होण्याची भीती खूप कमी असते
  • हॉस्पिटल मधील ऍडमिट राहण्याचा वेळ खूप कमी असतो
  • लवकर शाळेत किंवा कामाला जाता येते

लॅपरोस्कोपी ऑपरेशन चा चिरा लहान असल्याने भविष्यात त्या जागेवर आतडे चिपकून आतड्यात अडथळा येण्याचे प्रमाण फार कमी असते जे मोठा चिरा मारून केलेल्या ऑपरेशन मध्ये खूप जास्त प्रमाणात असते ज्यामुळे भविष्यात पुन्हा ऑपरेशन ची गरज पडू शकते.

लहान मुलांमधील लॅपरोस्कोपी ऑपरेशन व मोठ्या माणसांमधील लॅपरोस्कोपी ऑपरेशनचा काय फरक असतो ?

लहान मुलांमध्ये लॅपरोस्कोपी करण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरणे लहान असतात. लहान मुलांमध्ये लॅपरोस्कोपी ही खूप कमी जागेत करायची असते त्यामुळे हे ऑपरेशन करण्यासाठी तज्ज्ञ शिशूशल्यचिकित्सकाची गरज असते.

लॅपरोस्कोपीबद्दल आपल्या समाजात काही प्रकारचे गैरसमज असतात. परंतु पालकांनी हे जाणून घेणे फार महत्वाचे असते की आपल्या मुलाला योग्य उपचार योग्य वेळेत तसेच योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून भेटल्याने बाळाचे भविष्य हे चांगले राहते.

बऱ्याचदा विचारण्यात येणारे प्रश्न

लहान मुलांमध्ये लॅपरोस्कोपी हे ऑपरेशन होऊ शकते का ?

नवजात शिशूपासून मोठ्या माणसापर्यंत लॅपरोस्कोपी ऑपरेशन करण्यात येऊ शकते.

लॅपरोस्कोपी ऑपरेशन हे लहान ऑपरेशन असते की मोठे असते?

रुग्णाला असलेल्या आजारानुसार ऑपरेशन हे लहान कि मोठे हे ठरत असते. आजाराचे निदान करण्यासाठी, हर्निया असे ऑपरेशन छोटे असतात व अँपेंडिक्स, पित्ताशय, आतड्यांचे व किडनीचे ऑपरेशन हे मोठे असतात.

लॅपरोस्कोपी ऑपरेशन झाल्यानंतर लहान मुले केव्हा खेळायला लागतात ?

लॅपरोस्कोपी ऑपरेशन झाल्यानंतर लहान मुले लगेच खेळायला लागतात. पोटावरील टाके खूप कमी असल्याने लहान मुले पहिल्या २४ तासात खेळणे सुरु करू शकतात.

लॅपरोस्कोपी ऑपरेशन नंतर काय खावे?

ऑपरेशन नंतर शक्यतो तुमच्या मुलाला द्रव्यरूपी पदार्थ द्यावे जसे दूध, घरी बनवलेला फळांचा रस. ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवसापासून घट्ट पदार्थ खाण्यास देण्यात येऊ शकतात.

लॅपरोस्कोपी नंतर किती वेळाने चालता येऊ शकते?

लॅपरोस्कोपी नंतर ५-६ तासानंतर हालचाल करण्यास सुरवात करण्यात येते. चालत राहिल्याने रक्तातील रक्ताभिसरण वाढते व पचनक्रिया सुद्धा सुरळीत होते. काही दिवस अवजड काम करणे टाळावे

लॅपरोस्कोपी करण्यासाठी पोटात सोडलेला गॅस किती दिवसात कमी होतो?

लॅपरोस्कोपी करण्यासाठी पोटातील अवयव दिसून येण्यासाठी कार्बन डायॉक्सिड गॅस सोडण्यात येतो परंतु हा गॅस ऑपरेशननंतर ३-४ दिवसात हळूहळू कमी होतो. तोपर्यंत रुग्णाला पोटात गॅस असल्याचे भासूं येते.

लॅपरोस्कोपी नंतर कसे झोपणे चांगले असते?

लॅपरोस्कोपी नंतर जास्तकरून उताणे ( पाठ टेकवून) झोपलेले बरे असते परंतु रुग्णाला ज्या स्थिती मध्ये झोपणे आरामदायक वाटत असेल त्या स्थिती मध्ये झोपलेले बरे.

5/5 - (2 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “लॅपरोस्कोपी एक दुर्बीण शस्त्रक्रिया |Laparoscopy in marathi”

Leave a Comment