लहान मुलांमध्ये न्यूमोनिया झाला तर काय करावे | Pneumonia in Children in Marathi

Pneumonia in Children : लहान मुलांमध्ये सर्दी खोकला होणे हे खूप सामान्य आहे कारण त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शाळेत असतांना शाळेतील इतर संसर्ग झालेल्या मुलाच्या संपर्कात आल्याने त्यांना हा संसर्ग होऊ शकतो.

बऱ्याचदा सर्दी ,खोकला विषाणूमुळे होत असतो व तो तीन ते चार दिवसात बरा सुद्धा होऊन जातो. परंतु काहीवेळेस बाळाला ताप येण्यास सुरुवात होते अशा वेळी जास्त विलंब न करता आपल्या  बालरोग तज्ज्ञांशी संपर्क करावा कारण काही वेळेस यात सर्दी  खोकल्याचे रूपांतर न्यूमोनिया मध्ये होत असते.

चला तर मग जाणून घेऊ या लहान मुलांना होणाऱ्या न्यूमोनियाबद्दल संपूर्ण माहिती.

Table of Contents

न्यूमोनिया म्हणजे काय असतो? (What is Pneumonia in children in marathi?)

न्यूमोनिया फुफ्फुसांमध्ये होणारा संसर्ग असतो. सामान्यतः फुफ्फुसांमध्ये श्वास घेतलेल्या हवेतून ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड ची देवाण घेवाण होत असते.

परंतु फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्यात चिकट पदार्थ तयार होत असतो व हा चिकट पदार्थ श्वसन नलिकेत मध्ये बसून राहतो. त्यामुळे फुफ्फुसाचा तो भाग ऑक्सिजनची देवाणघेवाण करू शकत नाही. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो व बाळाचा खोकला वाढतो.

न्यूमोनिया हा पाच वर्षाखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

न्यूमोनिया होण्याचे काय कारण असते?

न्यूमोनिया हा विषाणू व्हायरस किंवा जीवाणू बॅक्टेरियामुळे होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकातोंडात जंतू असलेले थुंकी द्रव्य असते. जेव्हा तो व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. त्यावेळेस ते जंतू असलेले थुंकी द्रव्य हवेत पसरतात व ते तुमच्या मुलाच्या किंवा समोरील व्यक्तीच्या नाकातोंडातून आत शिरतात. व त्याला त्या जंतूचा संसर्ग होतो.

काही सामान्य विषाणू व जिवाणू ज्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो ते म्हणजे स्ट्रेप्टोकोकस, न्यूमोनिसायलोकॉकस अरियस, इन्फ्लुएन्झा  व्हायरस, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिंसायटीएल व्हायरस असतात. यापैकी कोणत्याही एका विषाणू किंवा जीवाणू मुळे न्यूमोनियाचा संसर्ग होऊ शकतो. काही वेळेस बुरशी (फंगस) मुळे सुद्धा न्यूमोनिया होऊ शकतो.

लहान मुलांमध्ये न्यूमोनिया जास्त प्रमाणात का होतो ?

लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचे प्रमाण हिवाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. काही कारणामुळे जर मुलाची प्रतिकारशक्ती कमी पडली किंवा वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण अधिक असते. मुख्यतः काही व्याधी असलेल्या मुलांमध्ये न्यूमोनिया जास्त प्रमाणात होतो. त्या व्याधी खालील प्रमाणे असतात.

 • लहान मुलाला हृदयाचा किंवा फुफ्फुसाचा जुनाट आजार असेल.
 • कमी दिवसाचे बाळ
 • मुलांना दम्याचा त्रास असेल
 • लहान मुलांची प्रतिकारशक्ती ही मोठ्या आजाराने कमी झालेली असेल.

लहान मुलांमध्ये न्यूमोनिया ची लक्षणे काय असतात?

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे ही वेगवेगळी असतात. परंतु काही सामान्य लक्षणे ही खालील प्रमाणे असतात.

 • खोकला येणे- न्यूमोनिया मध्ये बऱ्याचदा बाळ जेव्हा खोकलत असते तेव्हा बाळाच्या घशात कफ अडकला असल्यासारखा आवाज येतो.
 • ताप येणे- न्यूमोनिया मध्ये बाळाला जास्त प्रमाणात ताप येऊ शकतो.
 • जोराने श्वास घेणे- बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बाळ जोरजोरात श्वास घेते.
 • श्वास घेत असताना घरघर आवाज येणे व सोबतच छातीचे स्नायू हे बरगड्या मध्ये ओढले जाणे.
 • छातीत दुखून येणे.
 • बाळ सुस्त पडलेले असणे.
 • बाळाला भूक न लागणे.
 • बाळाचे ओठ काळे निळे पडणे.
 • जिवाणू मुळे झालेला न्यूमोनिया हा बाळाला लगेच आजारी करतो व बाळाला जास्त प्रमाणात ताप व श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. तर विषाणूमुळे झालेल्या न्यूमोनिया मध्ये ही लक्षणे हळूवार दिसून येतात

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे निदान कसे करण्यात येते?

डॉक्टर तुमच्या मुलाच्या तपासणीवरून व तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून न्यूमोनियाचे निदान करू शकतात व काही तपासण्या सुद्धा करण्यास सांगू शकतात.

 • छातीचा एक्स-रे– छातीचा एक्स-रे वर बाळाला कोणत्या ठिकाणी व किती प्रमाणात न्यूमोनियाचा संसर्ग झालेला आहे हे समजून येते.
 • रक्ताच्या तपासण्या- रक्तामध्ये किती प्रमाणात संसर्ग झालेला आहे हे समजून घेण्यासाठी डॉक्टर रक्ताची तपासणी करण्यास सांगतात. गंभीर आजार असलेल्या बाळांमध्ये रक्तातील ऑक्सिजन व कार्बनडायॉक्साईडचे प्रमाण जाणून घेण्यासाठी एबीजी नावाची तपासणी करण्यात येते.
 • स्फुटम कल्चर- काही वेळेस बाळाला झालेला संसर्ग ओळखण्यासाठी बाळाच्या थुंकीची तपासणी करण्यात येऊ शकते. लहान मुलांमध्ये हे सॅम्पल घेणे कठीण असल्याने क्वचितच ही तपासणी करण्यात येते.
 • सिटीस्कॅन- काही वेळेस बाळाच्या छातीचा सिटीस्कॅन करण्यात येतो. त्यात बाळाच्या श्वासनलिकेत काही अडकले तर नाही ना हे सुद्धा समजून येते ही तपासणी क्वचितच व गरज भासल्यास करण्यात येते.
 • ब्रोन्कोस्कोपी-  बऱ्याचदा वारंवार न्यूमोनिया होणाऱ्या बाळाचा श्वासनलिकेच्यामार्ग तपासण्यासाठी व त्यातील अडकलेला चिकट द्रव्य काढण्यासाठी ही तपासणी करण्यात येते.
 • प्लुरल फ्लूड कल्चर- काहीवेळेस बाळांना न्यूमोनियामध्ये छातीत पाणी जमा होते, किंवा पस तयार होतो.त्याची तपासणी करण्यासाठी म्हणजे त्यातील जंतू समजून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येऊ शकते.

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचा उपचार कसा करण्यात येतो ?

जर बाळाला बॅक्टेरियल न्यूमोनिया झालेला असेल तर त्याला अँटिबायोटिक देण्यात येतात. व्हायरल न्यूमोनिया हा काही दिवसात बरा होतो. फ्लू मध्ये बाळाला अँटिव्हायरस औषधी लागू शकतात.

न्यूमोनियाची लक्षणे कमी करण्यासाठी खालील उपाय करणे आवश्यक असते

 • आराम करणे
 • भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
 • ताप असेल तर पेरासिटामोल सिरप हे बाळाच्या वजनानुसार 15 ml/kg ने देणे.
 • खोकल्यासाठी औषध चालू ठेवावे.
 • औषधाची वाफ देणे.

वरील सर्व उपाय करून सुद्धा बाळाची लक्षणे कमी होत नसतील तर बाळाला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर बाळाला सलाईन लावण्यात येते. शिरेतून इंजेक्शन देण्यात येते ठराविक वेळाने वाफ देण्यात येते व ऑक्सिजनची गरज भासल्यास ऑक्सिजन सुद्धा लावण्यात येते. बाळाच्या नाका तोंडातील चिकट द्रव्य काढण्यात येतो.

वरील उपचारानंतर जवळपास 95% बाळ हे न्यूमोनियातून बरे होतात. तर उरलेल्यांना कॉम्प्लिकेशन होतात किंवा त्यांच्या जीवाला सुद्धा धोका असतो.

बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न

लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचे प्रमाण टाळता येऊ शकते का?

लहान मुलांना होणारे काही प्रकारचे न्यूमोनिया हे लसीकरणामुळे टाळता येऊ शकते. लहान बाळांमध्ये दीड महिना, अडीच महिना, साडेतीन महिना, या वेळेत न्यूमोनिया लसीचा डोस देऊन घेणे आवश्यक असते.
ज्या मुलांना वारंवार सर्दी खोकला होतो किंवा जी मुले मोठ्या आजाराने ग्रस्त आहेत व त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा मुलांना दरवर्षी फ्लूची लस दिल्याने त्यांना सर्दी खोकला व न्यूमोनिया होण्याचे प्रमाण कमी होते.
स्वच्छता ठेवल्याने म्हणजे बाळाचे हात वारंवार धुतल्याने व बाळाचा आहार व्यवस्थित ठेवल्याने सुद्धा न्यूमोनिया होण्याचे प्रमाण कमी होते.

सर्दीमुळे न्यूमोनिया होऊ शकतो का?

बाळाला सर्दी असेल तर त्याचा शेंबूड हा फुफ्फुसांमध्ये शिरून काही वेळेस न्यूमोनिया होऊ शकतो.

बाळाला न्यूमोनिया झाला असेल तर ऍडमिट करावे लागते का ?

बाळाच्या लक्षणांवरून व तपासणीतील चिन्हांवरून डॉक्टर बाळाला ऍडमिट करण्यास सांगू शकतात. अशा वेळी बाळाला ऍडमिट केलेले बरे असते कारण न्यूमोनिया हा असा आजार आहे जो एक दिवसात खूप प्रमाणात वाढू शकतो व सर्वात जास्त मृत्यू हे न्यूमोनिया मुळेच होतात.

न्यूमोनियाचा संसर्ग हा पसरू शकतो का ?

न्यूमोनियाचा संसर्ग हा संसर्ग झालेल्या व्यक्तीने खोक लल्यावर पसरू शकतो. परंतु काळजी घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हे होण्याचे प्रमाण फार कमी असते.

न्यूमोनियाचा उपचार घेतला नाही तर काय होते?

जर न्यूमोनिया साठी उपचार घेतला नाहीतर फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया अजून वाढतो व छातीत पाणी जमा होते. त्याला प्लुरल इफ्यूजन असे म्हणतात.
किंवा पस तयार होण्यास सुरुवात होते त्याला इम्पायेमा असे म्हणतात. अशा वेळी उपचार घेतला नाही तर जिवाला धोका वाढतो व जीव सुद्धा जाऊ शकतो.

लहान मुलाला न्यूमोनिया असेल तेव्हा काय खाण्यास द्यावे ?

लहान मुलांना न्यूमोनिया असताना सर्वप्रथम म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पाजावे. तसेच पचायला हलके असे अन्न खिचडी, वरण-भात-भाजी-पोळी सुद्धा देऊ शकतात. बाळाला एकाच वेळी पोटभरून खाऊ घालू नये. थोड्याथोड्या वेळाने खाण्यास द्यावे.
फळांमध्ये ज्या फळात विटामिन सी चे प्रमाण जास्त आहे म्हणजे संत्री, मोसंबी, केवी, अशी फळे खाण्यास द्यावी. बाळ जर अंडे खात असेल तर ते दिले तरी चालते. त्यातून बाळाला आवश्यक असे प्रोटीन मिळतात व बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

लहान मुलाला सर्दी खोकला झाला की जास्त दिवस घरगुती उपचार करत बसू नये कारण सर्दी खोकल्याचे रूपांतर निमोनिया मध्ये खूप कमी वेळात होऊ शकते. असे झाल्याने मुलाला हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची वेळ येते व खर्च सुद्धा वाढतो. त्यामुळे वेळेत बालरोगतज्ज्ञांकडून घेतलेला उपचार कधीही बरा.
तुम्हाला अजून काही शंका असतील तर कंमेंट करा. वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा.

5/5 - (2 votes)

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

2 thoughts on “लहान मुलांमध्ये न्यूमोनिया झाला तर काय करावे | Pneumonia in Children in Marathi”

Leave a Comment