बाळाला जन्मतः शी ची जागा नसली तर काय करावे | Imperforte Anus in Marathi

इम्परफोरेट अनुस (Imperforte Anus in Marathi) हा नवजात बाळांना जन्मतः असणारी गुदद्वाराची विकृती असते. सामान्यतः नवजात बाळांमध्ये मोठ्या आतड्यातून मल गुदाशयात व तेथून गुदद्वारामार्गे बाहेर येत असतो. काही बाळांमध्ये गुदद्वाराजवळील भाग आईच्या गर्भात असतांना विकसित झालेला नसतो. त्यामुळे काही बाळांचे गुदद्वार पूर्णपणे बंद असते किंवा सामान्य जागेवर नसता वेगळ्या जागेवर असते.

चला तर मग जाणून घेऊया इम्परफोरेट अनुस (Imperforte anus in marathi) (शी ची जागा नसणे)असलेल्या बाळांबद्दल माहिती व त्याचा काय उपचार असतो.

इम्परफोरेट अनुस म्हणजे काय?

इम्परफोरेट अनुस (Imperforte anus in marathi) म्हणजे बंद असलेला गुदद्वाराच्या मार्ग व सामान्य जागेपेक्षा वेगळ्या जागेवर असणारा गुदद्वाराच्या मार्ग. काही नवजात मुलींमध्ये गुदाशय व लघवीच्या मार्गात एक असामान्य मार्ग असतो तर मुलांमध्ये गुदाशय व लघवीच्या मार्गात एक असामान्य मार्ग असतो.

नवजात बाळांमध्ये हा आजार ५००० बाळांपैकीं एका बाळाला होत असतो. जास्त करून मुलांमध्ये इम्परफोरेट अनुस चा आजार मुलींपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतो.

काही मुलींमध्ये गुदद्वार, लघवीचा मार्ग व योनीचा मार्ग या भागाचा एकाच मार्ग असतो. त्याला क्लोयेका असे म्हणतात. हा आजार बाळ आईच्या गर्भात असतांना पाचव्या ते सातव्या आठवड्यात दिसून येत असतो.

इम्परफोरेट अनुस होण्याचे कारण काय असते?

लहान बाळांमध्ये इम्परफोरेट अनुस होण्याचे कारण काही स्पष्ट नसते परंतु काही लहान बाळांमध्ये हा आजार अनुवांशिकतेमुळे होऊ शकतो. काही वेळेस मुटेशन मुळे सुद्धा बाळाला हा आजार इतर काही आजारासोबत आढळून येतो. त्याला विक्टरल (VACTERL) असे म्हणतात.

VACTERL आजारांमध्ये व्ही म्हणजे मणक्याची समस्या, म्हणजे बंद असलेले गुदद्वार, सी म्हणजे हृदयाची विकृती, टी म्हणजे अन्ननलिका व श्वसननलिका यात असलेला असामान्य मार्ग, म्हणजे बंद असलेली अन्ननलिका, आर म्हणजे किडनीची विकृती व एल म्हणजे हातापायाची काही विकृती म्हणून इम्परफोरेट अनुस असणाऱ्या बाळांमध्ये यातील काही आजार तर नाही ना याची तपासणी करून घेणे खूप महत्वाचे असते.

इम्परफोरेट अनुस या आजाराचे प्रकार कोणते असतात?

इम्परफोरेट अनुस (Imperforate anus in marathi) ही एक प्रकारची विकृती असल्याने ती वेगवेगळ्या प्रकारात दिसून येते. तीन प्रकारच्या विकृती या आजारात दिसून येतात.

१) हाय टाईप – या विकृतीत गुदद्वार बंद असते व गुदाशय हे ओटीपोटाच्या वर बंद झालेले असते. अश्या प्रकारात फिस्टुला तयार होण्याची शक्यता जास्त असते.

२) इंटरमिजिएट टाईप – गुदद्वाराच्या मार्ग हा ओटीपोटाच्या खालच्या भागात बंद झालेला असतो तसेच अश्या बाळांमध्ये फिस्टुला होण्याची शक्यता असते.

३) लो टाईप – गुदद्वाराच्या मार्ग हा असामान्य जागेवर असतो व काही वेळेस त्यावर एक मांसल पडदा असतो.

इम्परफोरेट अनुस ची लक्षणे काय असतात?

इम्परफोरेट अनुसची लक्षणे ही जन्मतः दिसून येतात व ती खालील प्रमाणे असू शकतात.

१) गुदद्वाराच्या जागा नसणे (शी ची जागा नसणे)

२) गुदद्वाराच्या जागा ही सामान्य जागी नसता, असामान्य जागी असणे. मुलींमध्ये योनीजवळ असणे.

३) नवजात बाळाने पहिल्या २४ तासात शी केलेली नसणे.

४) बाळाचा मल दुसऱ्या ठिकाणावून बाहेर येणे म्हणजे लघवीच्या मार्गातून, योनीच्या मार्गातून, लिंगाच्या खाली असलेल्या थैलीतून शी बाहेर येणे. जर आतडे व लघवीचा मार्गात फिस्टुला तयार झालेला असेल तर शी लघवीच्या मार्गातून बाहेर येत असते. जर आतडे व योनीच्या मार्गात फिस्टुला तयार झालेला असेल तर शी योनीच्या मार्गातून बाहेर येते.

५) पोटावर सूज आलेली असेल.

जर बाळाचे निदान वेळेवर झालेले नसेल तर बाळाच्या आजाराची लक्षणे वाढू शकतात जसे पोट खूप फुगून येणे, बाळ खूपच सुस्त पडणे, बाळाला हिरव्या रंगाच्या उलट्या होणे. काही बाळांमध्ये या आजारासोबत विक्टरल हे आजार सुद्धा दिसून येत असतात. तसेच ५० टक्के बाळांमध्ये खालील आजार सुद्धा दिसून येतात.

१) ड्युओडिनल अत्रेंसीया (Duodenal Atresia) – या आजारात लहान आतड्याचा सुरवातीचा भाग हा विकसित झालेला नसतो.

२) हुर्षपरुंग डिसीज (Hirschprung Disease) – या आजारात मोठ्या आतड्यामधील मज्जातंतू हे विकसित झालेले नसतात.

३) डाऊन सिंड्रोम (Down Syndrome) – या आजारात लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टी कमी प्रमाणात समजून येत असतात. त्यांची बुद्धिमत्ता ही काही प्रमाणात कमी असते व त्यांचा चेहरा विशिष्ट प्रकारचा असतो.

इम्परफोरेट अनुस चे निदान कसे करण्यात येते ?

इम्परफोरेट अनुस चे निदान हे डॉक्टर बाळाला गुदद्वाराची जागा नसल्याच्या तपासणीवरून करतात. जन्मतः अश्या बाळांना गुदद्वाराची जागा नसते किंवा वेगळ्या जागेवर असते. काही बाळांमध्ये हा आजार आई गर्भवती असतांना केलेल्या सोनोग्राफीत कळून येत असते. निदान झाल्यावर डॉक्टर कोणत्या प्रकारचे अनोरेक्टल मालफॉर्मेशन आहे हे समजून घेण्यासाठी खालील प्रकारच्या तपासण्या करतात.

१) पोटाचा एक्स रे – पोटाच्या एक्स रे मध्ये अनोरेक्टल मालफॉर्मेशन कोणत्या जागेवर आहे हे समजून येते म्हणजे इम्परफोरेट अनुस चा प्रकार समजून येतो. तसेच मणक्यांमध्ये काही विकृती असेल तर ती दिसून येते.

२) पोटाची सोनोग्राफी – किडनी व लघवीच्या मार्गातील विकृती ही सोनोग्राफीत समजून येते. तसेच मुलींमध्ये प्रजनन संस्थेमधील विकृती सुद्धा या तपासणीत समजून येत असते.

३) स्पायनल सोनोग्राफी – या सोनोग्राफीत मणक्यातील काही विकृती दिसून येते तसेच पाठीच्या कण्यातील मज्जातंतू हे पूर्णपणे विकसित झालेले नसेल तर ते समजून येते. याला टेंडर्ड स्पायनल कॉर्ड असे म्हणतात. या आजारात बाळाला लघवी व शी वर संयम राहत नाही तसेच पायांमध्ये कमजोरी असते.

४) एम आर आय – मणक्यातील समस्या तसेच टेंडर्ड स्पायनल कॉर्ड समजून येण्यासाठी ही तपासणी करण्यात येते.

५) इकोकार्डिओग्राम – हृदयामध्ये असेलेली विकृती समजून येण्यासाठी २ डी इको करण्यात येत असतो.

वरील सर्व तपासण्या लगेच करणे महत्वाचे नसते. डॉक्टर आवश्यकतेनुसार बाळाच्या तपासण्या करू शकतात कारण इम्परफोरेट अनुस ही एक इमर्जन्सी असते त्यामुळे या आजाराचा उपचार योग्य वेळेत जर घेतला तर बाळाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

इम्परफोरेट अनुस चा उपचार काय असतो?

इम्परफोरेट अनुस चा उपचार हा ऑपरेशनच असतो कारण बाळाला शी ची जागा नसल्याने ती आतड्यांमध्ये जमा होत असते. त्यामुळे आतडे फुटून पोटात संसर्ग पसरू शकतो व जीवाला धोका वाढतो.    

लो टाईप इम्परफोरेट अनुस असल्यास अश्या बाळांमध्ये एका ऑपरेशन मध्ये गुदद्वाराच्या मार्ग तयार करण्यात येत असतो.

इंटरमिजिएट टाईप व हाय टाईप हे गुंतागुंतीचे असल्याने हे दुरुस्त करण्यासाठी तीन प्रकारचे ऑपरेशन करतात.

१) सुरवातीला बाळाचा जीव वाचावा म्हणून बाळाच्या पोटावर शी बाहेर येण्याचा मार्ग तयार करण्यात येत असतो. या ऑपरेशन ला कोलोस्टोमी असे म्हणतात.

२) दुसऱ्या ऑपरेशन मध्ये बाळाच्या गुदद्वाराच्या जागा तयार करण्यात येत असते. या ऑपरेशन ला एनोरेक्टोप्लास्टी असे म्हणतात.

३) तिसऱ्या ऑपरेशनमध्ये पोटावर असलेली शी ची जागा बंद करण्यात येते जेणेकरून बाळ सामान्य जागेवरून शी करण्यास सुरवात करते. या ऑपरेशन ला कोलोस्टोमी क्लोजर असे म्हणतात.

आतापर्यंत तुम्हाला नक्की समजून आले असेल कि इम्परफोरेट अनुस असलेल्या बाळाचा उपचार कसा करण्यात येतो व त्यामुळे त्याचा जीव सुद्धा वाचू शकतो.

चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया या वेगवेगळ्या ऑपरेशनबद्दल माहिती जी आई वडिलांनी माहिती करून घेणे आवश्यक असते.

१) कोलोस्टोमी (Colostomy in marathi) – कोलोस्टोमी हे ऑपरेशन बाळाचा जीव वाचवण्यासाठी खूपच महत्वाचे असते कारण शी ची जागा नसल्याने बाळाचा जीव धोक्यात असतो अश्या वेळी शी ची जागा पोटावर तयार करण्यात येत असते. त्यामुळे बाळाचा जीव वाचतो. या ऑपरेशनमध्ये सर्जन डॉक्टर स्टोमा तयार करत असतात. या स्टोमा मध्ये वरील मोठ्या आतड्याचा भाग तसेच खालील मोठ्या आतड्याचा भाग एकमेकांना जोडून मार्ग तयार करण्यात येत असतो. त्याला स्टोमा असे म्हणतात.

आतड्याच्या वरील भागातून शी बाहेर येत असते तसेच आतड्याच्या खालच्या भागातून चिकट द्रव्य बाहेर येत असते. स्टोमाची काळजी कशी घ्यावी हे डॉक्टर समजावून सांगतात त्याप्रमाणे घरी विशेष काळजी घ्यावी लागते. हे ऑपरेशन जन्म झाल्यावर व इम्परफोरेट अनुस चे निदान झाल्यावर लगेच करण्यात येत असते.

२) अनोरेकटोप्लास्टी व पूल थ्रू (Anoprectoplasty and Pull through in marathi) – कोलोस्टोमी केल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी हे ऑपरेशन करण्यात येत असते. अनोरेक्टोप्लास्टी या ऑपरेशन मध्ये बाळाला शी च्या जागेवर तयार झालेल्या फिस्टुला चे मार्ग बंद करण्यात येतात. त्यामुळे लघवीच्या मार्गातून तसेच योनीच्या मार्गातून शी बाहेर येणे बंद होते व त्यासोबत गुदद्वाराच्या मार्ग तयार करण्यात येत असतो. या ऑपरेशनला पोस्टेरीअर सजायटल अनोरेक्टोप्लास्टी असे म्हणतात.

तसेच पूल थ्रू ऑपरेशन मध्ये गुदद्वाराच्या मार्ग खाली आणून नवीन शी चा मार्ग तयार करण्यात येत असतो. तो तयार केलेला मार्ग अरुंद होऊ नये म्हणून गुदद्वाराच्या तो भाग एका स्टील रॉडने (डायलेटर) रोज मोठा करण्यास डॉक्टर सांगतात. याला अनल डायलेटेशन असे म्हणतात. काही महिन्यांसाठी अनल डायलेटेशन हे करावे लागू शकते.

३) कोलोस्टोमी क्लोजर (Colostomy Closure in marathi) – या ऑपरेशनमध्ये बाळाच्या पोटावर काढलेली शी ची जागा बंद करण्यात येत असते. तसेच वरील मोठ्या आतड्याचा भाग खालील मोठ्या आतड्यासोबत टाक्यांनी जोडण्यात येत असतो. जेणेकरून बाळ सामान्य जागेवरून शी करण्यास सुरवात करते.

या ऑपरेशन नंतर बाळाच्या नाकात नळी (फिडींग ट्यूब) टाकण्यात येत असते. तसेच बाळाला तोंडाने काही आहार देण्यात येत नसतो. परंतु बाळाच्या शरीराला बाळाच्या वजनानुसार आवश्यक तेवढे सलाईन देण्यात येत असते. जोपर्यंत टाके असलेला आतड्याचा भाग काम करणे सुरु होत नाही व बाळ शी करण्यास सुरवात करत नाही तोपर्यंत नाकात नळी ठेवलेली असते. या नळीतून पोटात जमा होणारे पित्त हे बाहेर काढण्यात येते. बाळाची शी ची जागा काम करू लागल्यावर बाळाला हॉस्पिटल मधून सुट्टी करण्यात येते.

वरील तिन्ही ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांना वारंवार दाखवणे फार महत्वाचे असते. कारण ऑपरेशन झालेल्या जागेवरील मज्जातंतू विकसित नसल्याने बाळाला व्यवस्थितपणे टॉयलेट ट्रेनिंग द्यायचे असते. टॉयलेट ट्रेनिंग हे पालकांनी बाळाला वयाच्या तिसऱ्या वर्षी देणे फार महत्वाचे असते.

इम्परफोरेट अनुस (Imperforte anus in marathi) असलेल्या बाळाची नीट काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते. पालकांसाठी हे खूप कष्टदायी असते परंतु निष्णात शिशूशल्यचिकित्सक कडून ऑपरेशन केल्याने बाळाचा जीव वाचतो व आयुष्य सुद्धा सामान्य होते. पालकांनी संयम ठेवणे हे सुद्धा फार महत्वाचे असते.

इम्परफोरेट अनुस चे ऑपरेशन झालेल्या बाळांमध्ये काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात?

लहान बाळाच्या ऑपरेशन झालेल्या जागेवरील मज्जातंतू सामान्यपणे विकसित न झाल्याने काही बाळांना बद्धकोष्टतेचा त्रास होऊ शकतो. तसेच काही बाळांचे शी करण्यावर नियंत्रण नसते. परंतु खालील उपाय केल्यानंतर बाळाची ती समस्या कमी होऊ शकते.

१) बाळाला बद्धकोष्टता असेल तर डॉक्टर बाळाला शी साफ होण्यासाठी औषध देऊ शकतात.

२) बाळाच्या आहारात बदल करणे फार आवश्यक असते. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असावा व मैदा असलेले पदार्थ टाळावे तसेच पाणी भरपूर प्रमाणात पाजावे.

३) बाळाला नीट टॉयलेट ट्रेनिंग देणे फार महत्वाचे असते.

वरील उपाय व्यवस्थित केल्याने तुमचे बाळ सामान्य जीवन जगू शकते.

इम्परफोरेट अनुस हा आजार इमर्जन्सी असते का ?

इम्परफोरेट अनुस मुळे बाळाला शी करण्यास जागा नसते त्यामुळे ती आतड्यांमध्ये फासून राहते व आतडे त्यामुळे फुगून फाटू शकतात व बाळाच्या जीवाला धोका उद्भवतो. त्यामुळे इम्परफोरेट अनुस ही एक इमर्जन्सी असते.    

Rate this post

डॉ निखिल राणे हे सल्लागार बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे त्यांना आवडते.

1 thought on “बाळाला जन्मतः शी ची जागा नसली तर काय करावे | Imperforte Anus in Marathi”

Leave a Comment