Hydrocele in Marathi : लहान मुलांमध्ये बऱ्याचदा अचानक पणे किंवा जन्मत: (स्क्रोटममध्ये) अंडाशयाच्या थैलीत सूज येत असते. अशा वेळेस बाळाला हायड्रोसील किंवा हर्निया असण्याची शक्यता असते. असे झाल्याने मुलाचे पालक घाबरून जातात. तर असे न करता आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला सल्ला घेणे आवश्यक असते. तर या लेखमध्ये चला तर मग जाणून घेऊया, हायड्रोसिल कसा होतो ते होण्याची कारणे काय असतात व त्यावर उपचार काय असतो.
हायड्रोसिल म्हणजे काय ? (What is hydrocele in marathi?)
सामान्यतः मुलांमध्ये अंडाशयाच्या आवरणावर एक थर असतो त्या थरांमध्ये पाणी तयार होत असते. त्यामुळे अंडाशय मुक्तपणे फिरू शकते. जर त्या थरात जास्त प्रमाणात पाणी तयार झाले तर, ते शिरेतून पुन्हा रक्तात जाते.
परंतु जेव्हा हे पाणी जमा होण्याच्या व शिरेतून जाण्याची प्रक्रिया असंतुलित होते त्यावेळेस मुलाच्या अंडाशयाच्या आजूबाजूला हे पाणी वाढण्यास सुरुवात होते व त्यामुळे त्या जागेवर मुलाला अंडाशयाच्या थैलीत सूज येते. या पाण्यामुळे स्क्रोटममध्ये आलेल्या सुजेला हायड्रोसिल असे म्हणतात. हायड्रोसिल हे एक बाजूला किंवा काही वेळेस दोन्ही बाजूला सुद्धा दिसून येते.
हायड्रोसिल होण्याची कारणे काय असतात ?
लहान बाळ हे जेव्हा आईच्या गर्भात असते त्यावेळेस सर्व बाळांमध्ये पोट व ओटीपोटाच्या जवळ एक मार्ग (इंग्वायनल कँनल) असतो. मुलांमध्ये तो स्क्रोटम मध्ये उघडतो तर मुलींमध्ये तो लॅबियामध्ये उघडतो. या मार्गाच्या आवरणाला प्रोसेस व्हजायनालीस असे म्हणतात. सामान्यतः मुला-मुलींमध्ये हा मार्ग जन्माआधी बंद होत असतो.
नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसिल
ज्यावेळेस हा मार्ग बंद होतो त्यावेळी अंडाशयाच्या आजूबाजूला जमा झालेले पाणी अडकून राहते. त्यामुळे या जमा झालेल्या पाण्याचे पोटाशी काही कम्युनिकेशन नसते, म्हणून याला नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसिल असे म्हणतात.
कम्युनिकेटिंग हायड्रोसिल
जर इंग्वायनल कँनल जन्मावेळी बंद झालेला नसेल तर स्क्रोटम मध्ये जमा झालेले पाणी हे पोटाशी कम्युनिकेशन असल्याने कमी सुद्धा होते. म्हणून याला कम्युनिकेटिंग हायड्रोसिल असे म्हणतात.
अशा हायड्रोसील बरोबर मुलाला हर्निया सुद्धा असू शकतो कारण इंग्वायनल कँनलचा मार्ग उघडा असल्याने त्यातून पोटातील आतडे स्क्रोटममध्ये शिरू शकतात. यात स्क्रोटमवरची सूज म्हणे सुद्धा कमी होऊ शकते व पुन्हा पुन्हा येत असते.
मोठ्या माणसांमध्ये जर अंडाशयाला काही इजा झालेली असेल तेव्हा अंडाशयाच्या किंवा त्याच्या नळीचा संसर्ग झालेला असेल तर हायड्रोसील तयार होऊ शकते.
बाळांमध्ये हायड्रोसील हे जन्मतः दिसून येते. जवळपास जन्माला येणाऱ्या पाच टक्के बाळामध्ये हायड्रोसिल दिसून येते. कमी दिवसाच्या बाळांमध्ये हायड्रोसिल होण्याचे प्रमाण अधिक असते.
लहान मुलांमध्ये हायड्रोसिलची लक्षणे काय असतात ?
प्रत्येक बाळाचे लक्षण हे वेगवेगळे असू शकते त्यात मुख्यतः स्क्रोटमवर सूज येणे व ती सूज न दुखणारी असणे. तसेच काही मुलांमध्ये स्क्रोटमवरची सूज झोपल्यावर कमी होत असते व दिवसा वाढत असते.
लहान मुलांमध्ये हायड्रोसिल चे निदान कसे करण्यात येते ?
लहान मुलाला असलेल्या लक्षणांवरून व त्याच्या शारीरिक तपासणी वरून डॉक्टर त्याला हायड्रोसिल असल्याचे निदान करतात.
ट्रान्स इल्लुमिनेशन टेस्ट
बऱ्याचदा डॉक्टर सूज आलेल्या भागावर टॉर्च लावून दुसऱ्या बाजूने पाहतात.जर टॉर्चचा उजेड दुसऱ्या बाजूने दिसून येत असेल, तर तो हायड्रोसिल असतो व जर दिसत नसेल तर तो हर्निया असतो. या तपासणीला ट्रान्स इल्लुमिनेशन टेस्ट असे म्हणतात.
सोनोग्राफी
शारीरिक तपासणी वरून हायड्रोसिलचे निदान होते, परंतु मुलाला त्यासोबत इतर काही आजार तर नाही ना ? हे तपासून घेण्यासाठी सोनोग्राफी करण्यात येऊ शकते.
लहान मुलांमध्ये हायड्रोसिलचा काय उपचार असतो ?
जर मुलाला नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसिल असेल तर ते मुलाच्या पहिल्या वाढदिवसा पर्यंत बरे होऊन जाते. म्हणजे स्क्रोटमवरची सूज पूर्णपणे कमी होते. त्यामुळे डॉक्टर लगेच ऑपरेशन न करता एक वर्षे वाट पाहण्यास सांगतात. एक वर्षानंतर सुद्धा स्क्रोटमवरची सूज कमी झालेली नसेल तर त्या मुलाला ऑपरेशनची गरज पडू शकते.
जर मुलाला कम्युनिकेटिंग हायड्रोसिल असेल तर त्या मुलाला निश्चितच ऑपरेशन करावे लागते. कारण इंग्वायनल कँनल मार्ग काही परस्पर बंद होऊ शकत नाही व अशा मुलांमध्ये सोबत इंग्वायनल हर्निया होण्याची शक्यता असते.
लहान मुलांमध्ये हायड्रोसिलचे ऑपरेशन कसे करण्यात येते ?
हायड्रोसिलच्या ऑपरेशनला हायड्रोसिलेटॉमी (Hydrocelectomy) असे म्हणतात. हे ऑपरेशन डे-केअर सर्जरी असते म्हणजे बाळाला ज्या दिवशी ऑपरेशन होते त्या दिवशी सुट्टी भेटू शकते. हे ऑपरेशन बाळाला भूल देऊनच करण्यात येत असते.
हायड्रोसिलच्या ऑपरेशनमध्ये बाळाच्या जांघेत एक चिरा मारण्यात येतो व स्क्रोटममध्ये जमा झालेले पाणी काढून टाकण्यात येते व इंग्वायनल सॅकचा काही भाग काढून टाकण्यात येतो.
जर बाळाला कम्युनिकेटिंग हायड्रोसिल असेल तर त्याला भविष्यात हर्निया होऊ नये म्हणून तो मार्ग वीर्याची नळी व रक्तवाहिन्या बाजूला करून टाक्यांनी बंद करण्यात येतो. नंतर जांगेतील शिरा मारलेला भाग सुद्धा टाक्यांनी बंद करण्यात येतो या ऑपरेशनचे कॉम्प्लिकेशन खूपच दुर्मिळ असतात.
ऑपरेशन नंतर डॉक्टर मुलाचे दुखणे कमी राहण्यासाठी व टाक्यांवर संसर्ग न होण्यासाठी औषधे देतात. लहान मुलांना या ऑपरेशनचा जास्त त्रास होत नाही. डॉक्टरांना त्यांनी दिलेल्या तारखेला पुन्हा दाखविणे आवश्यक असते. वरील सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्की कळून आले असेल की, तुमच्या बाळाला जर असा काही आजार असेल तर काय करावे?
बरेचदा विचारण्यात येणारे प्रश्न
हायड्रोसिलचा जीवाला धोका असतो का ?
हायड्रोसिलचा जीवाला धोका नसतो परंतु कम्युनिकेटिंग हायड्रोसिल सोबत हर्निया व असला तर बाळाच्या पोटातील आतडे इंग्वायनल मार्गात फसू शकतात. त्यामुळे अशा वेळेस मुलाला त्वरित ऑपरेशनची गरज पडते.
हायड्रोसिल औषधाने बरा होतो का ?
हायड्रोसिल हा आजार औषधाने बरा होत नाही. जर नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसिल असेल तर तो एक वर्षापर्यंत बरा होतो व तो बरा झाला नाही तर ऑपरेशनची गरज पडते.
हायड्रोसिल मध्ये जमा होणारे पाणी काय असते?
हायड्रोसिल मध्ये जमा होणाऱ्या पाण्याला सिरस फ्लयुड असे म्हणतात.
हायड्रोसिल मध्ये अंडाशय किंवा वीर्यावर काही परिणाम होतो का?
सामान्यतः हायड्रोसिलचा अंडाशय व मोठ्या माणसांमध्ये वीर्यावर काही परिणाम होत नाही. परंतु हायड्रोसिल हे अंडाशयाचा संसर्ग किंवा गाठीमुळे झालेले असेल तर वीर्यावर त्याचा परिणाम होतो.
हायड्रोसिल व व्हेरिकोसील मध्ये काय फरक असतो ?
हायड्रोसिल मध्ये अंडाशयाच्या आजूबाजूला पाणी जमा झालेले असते. तर व्हेरिकोसील मध्ये अंडाशयापासून निघणाऱ्या शिरांना सूज आलेली असते.
ऑपरेशन झाल्यानंतर स्क्रोटमवरची सूज संपूर्णपणे कमी होते का ?
जवळपास 99% पेशंटमध्ये स्क्रोटमवरची सूज पूर्णपणे कमी होते. तसेच जर काही प्रमाणात सूज उरलेली असेल तर ती एक महिन्यात संपूर्णपणे कमी होऊन जाते.
हायड्रोसिलच्या ऑपरेशनमुळे मुलाला भविष्यात प्रजनन संबंधित त्रास होतो का ?
हायड्रोसिलच्या ऑपरेशन मुळे मुलाला भविष्यात प्रजननासाठी काही त्रास होत नाही. त्यामुळे तज्ज्ञ शिशुशल्यचिकित्सकाकडूनच ऑपरेशन केलेले कधीही बरे.
लहान मुलाला हायड्रोसिल असेल तर घाबरून न जाता शिशूशल्यचिकित्सकांचा सल्ला घेवा आवश्यक असते. हायड्रोसिल चे ऑपरेशन हे डे केयर सर्जरी असल्याने बाळाला एक दिवसात हॉस्पिटल मधून सुट्टी होते. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट करू शकतात व लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.
Very useful information,
Thanks a lot sir